अंतर्गत मूल्यांकनाचा फायदा, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची चढाओढ आदी बाबी बारावीचा निकाल उंचावण्यास कारणीभूत ठरल्या असल्या तरी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कधी नव्हे ती वाढलेली स्पर्धात्मकताही बारावीमधील विद्यार्थ्यांच्या भरघोस यशाला कारणीभूत ठरते आहे. कारण, मुंबईतील अनेक महाविद्यालयांनी आपला निकाल गुणात्मकदृष्टय़ा वाढविण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे.
विशेष कोचिंगद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उंचावण्याचे हे प्रयत्न आतापर्यंत शाळांपुरते मर्यादित होते. परंतु, महाविद्यालयांमधील विना अनुदानित अभ्यासक्रमांच्या जागा भरण्यासाठी वाढलेल्या स्पर्धात्मकतेच्या निमित्ताने का होईना मुंबईतील अनेक वरिष्ठ महाविद्यालयाला जोडलेली कनिष्ठ महाविद्यालये आपल्या विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालावर विशेष लक्ष केंद्रित करू लागली आहेत. याचा फायदा कमी गुण मिळवणाऱ्या तसेच ज्यांना क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले आहे. विलेपार्ले येथील एम. एल. डहाणूकर या वाणिज्य महाविद्यालयाचा बारावीचा निकाल यंदा ९९.६७ टक्के इतका लागला आहे. म्हणजे या महाविद्यालयातून बसलेल्या तब्बल ६०० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५९८ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इतकेच नव्हे तर प्रथम श्रेणी किंवा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
प्रत्येक पातळीवरील मुलाचा निकाल वाढावा यासाठी आम्ही शिक्षकांच्या मदतीने नियोजन केले होते. जी मुले हुशार आहेत, त्यांचा निकाल गुणात्मकदृष्टय़ा वाढावा यासाठी आम्ही विशेष मार्गदर्शन दिले होतेच. या शिवाय जी मुले मागे होती, त्यांचे वेगळे वर्ग घेऊन निकाल सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. याचे फलित आम्हाला निकालाच्या आकडेवारीत दिसून येते.
माधवी पेठे,
प्राचार्या,  एम. एल. डहाणूकर महाविद्यालय
महाविद्यालयाच्या वतीने परीक्षेच्या आधी निवृत्त शिक्षकांचे तीन दिवसांचे ‘लर्न फ्रॉम स्टॉलवर्ट’ हे विशेष सत्र आयोजित केले जाते. त्यात संपूर्ण अभ्यासक्रमाचा आढावा घेतला जातो. विद्यार्थ्यांचे शंकासमाधान करण्यापासून त्यांनी कुठल्या विषयावर लक्ष केंद्रित करायचे यावर हे शिक्षक मार्गदर्शन करतात. याचा फायदा आम्हाला निकाल वाढविण्याच्या दृष्टीने झाला,. या शिवाय सीईटी, सीपीटी आदी स्पर्धा परीक्षांना मदत व्हावी यासाठी ऑनलाइन चाचण्या सरावाच्या दृष्टीने घेतल्या जातात. त्याचे फलित म्हणून यंदा महाविद्यालयाचा निकाल ९८.८९ टक्के इतका लागला असून १२५८ पैकी १२४४ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विजय जोशी
प्राचार्य, के. जे. सोमैय्या महाविद्यालय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा