महसुलात गळती थांबवावी, तसेच मुद्रांक विक्रीत पारदर्शकता यावी, या उद्देशाने नोंदणी महानिदेशक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. भविष्यात आता मुद्रांक खरेदी करताना संबंधिताला त्याचे कारण स्पष्ट करावे लागणार आहे.
राज्यात तेलगी घोटाळा चांगलाच गाजला. बनावट मुद्रांकाच्या आधारे सरकारची फसवणूक झाली. मुद्रांक खरेदी किंवा विक्री करताना फारशी बंधने नव्हती. आता मात्र महसुलाची गळती थांबवावी, तसेच बनावट मुद्रांक विक्री होऊ नये, या उद्देशाने नोंदणी महानिदेशक कार्यालयाने काही फेरबदल केले आहेत. नव्या बदलामुळे बनावट मुद्रांक विक्री तर होणारच नाही, शिवाय सामान्यांची फसवणूकही टळू शकेल.
नव्या नियमानुसार मुद्रांक खरेदी-विक्रीवर बंधने घातली आहेत. एकदा मुद्रांक खरेदी केल्यावर त्याचा वापर सहा महिन्यांच्या आतच करावा लागेल. त्यामुळे मागच्या तारखेत मुद्रांकावर व्यवहार दाखवून होणारी फसवणूक टळणार आहे. एरवी मुद्रांक खरेदी करताना तो कशासाठी खरेदी केला, याचा उल्लेख केलेला नसे. परंतु नोंदणी महानिदेशक कार्यालयाने दोन शिक्के बनविण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक वापर होणार असेल, तर त्यासाठी एक शिक्का व अन्य कारणासाठी मुद्रांक खरेदीसाठी अन्य शिक्का मुद्रांकामागे उमटवणे बंधनकारक केले आहे.
प्रतिज्ञापत्रासाठी स्वतंत्र शिक्का असून त्यावर प्रतिज्ञापत्र कोणत्या कार्यालयाकडे सादर करायचे, त्याचे कारण काय, हे लिहिणे बंधनकारक केले आहे. प्रतिज्ञापत्राशिवाय मुद्रांक खरेदी करायचा असेल, तर दस्तनोंदणी करणार का, कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करणार, मालमत्तेचे वर्णन काय, मोबदल्याची रक्कम, मुद्रांक विकत घेणाऱ्याचे नाव, पक्षकाराचे नाव, मुद्रांक शुल्क रक्कम याची लेखी उत्तरे देणे आवश्यक आहे.
नोंदणी महानिदेशक कार्यालयाने या दोन्ही शिक्क्यांचा नमुना राज्यभरातल्या सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाकडे पाठवला. विशेष म्हणजे प्रतिज्ञापत्रासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी मुद्रांक खरेदी केल्यानंतर संबंधित मुद्रांक विक्रेत्याने त्याची माहिती एसएमएसद्वारे संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाला देणे बंधनकारक केले आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी तातडीने सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांनी मुद्रांक विक्रेत्यांना राज्य सरकारचे आदेश निर्गमित केले आहेत. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या नव्या फतव्याने मुद्रांक खरेदी व विक्री करणाऱ्यांची डोकेदुखी तर वाढलीच आहे, शिवाय दुय्यम निबंधकांच्या कामात आणखीच भर पडली आहे. या नव्या नियमामुळे मुद्रांक विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल, तसेच सामान्यांना त्याचा चांगला फायदा होईल, अशी प्रतिक्रिया दुय्यम निबंधक सुभाष निलावडे यांनी व्यक्त केली.