जिल्हा वार्षिक योजनेतील विकासकामांच्या निधी वाटपावरून सुरू झालेला पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर व काँग्रेसचे आमदार सुरेश नवले यांच्यातील कलगीतुऱ्याने आता दुष्काळी आढावाच्या बैठकीवरून वाद पेटला आहे. पालकमंत्र्यांनी प्रशासनावर दबाव आणून बैठकीपासून आमदाराला बाजूला ठेवले. दुष्काळी आढावा बैठकांच्या नावाखाली अधिकाऱ्यांना लक्ष केले जात आहे, असा आरोप केला आहे. पालकमंत्री गेवराई, शिरूर तालुक्यात जावून तर सर्वाधिक दुष्काळ असलेल्या आष्टी, पाटोदा तालुक्याच्या बैठका शहरात घेऊन आढाव्याची औपचारिकता पूर्ण केली.
जिल्ह्य़ात पावसाअभावी भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. मागील महिन्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांनी पालकमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन दुष्काळी आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत पालकमंत्री क्षीरसागर यांनी गेवराई, शिरूर या तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन बैठका घेतल्या.
आष्टी, पाटोदा या तालुक्यांच्या बैठका जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात घेतल्या. बीड तालुक्याची बैठक सोमवारी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात घेतली. बीड तालुक्याच्या बैठकीला काँग्रेसचे स्थानिक विधान परिषद आमदार सुरेश नवले यांना बोलविले नाही. त्यामुळे नवले यांनी जाहीर पत्रक काढून पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून प्रशासनाने या बैठकांपासून आपल्याला दूर ठेवण्याचा आरोप केला. नाटय़गृहात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना प्रत्येकवेळी हस्तक्षेप क रून अधिकाऱ्यांची बाजू सावरावी लागली.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मागील महिन्यात विकासकामांचा निधी वाटपावरून पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि काँग्रेसचे आमदार नवले यांच्यात कलगीतुरा रंगला. सर्वच तालुक्यांना समान वाटप आणि सर्वच लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार विकासकामांना निधी द्यावा, अशी मागणी करत पालकमंत्र्यांच्या एकाधिकारशाहीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न नवले यांनी केला. त्यामुळेच नवले यांना बैठकांपासून दूर ठेवले गेल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे भविष्यातील राजकीय दृष्टिकोनातून दुष्काळी बैठकांवरून नवले आणि क्षीरसागर यांच्यातील वाद पेटल्याची चिन्हे आहेत.

Story img Loader