वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बोरिवली स्थानकापासून गोराई रस्त्यावर बेफामपणे आणि बेदरकारपणे रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवाशी आणि पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळणारे हे मुजोर चालक मुख्यत्वेकरून गोराई ते बोरिवली स्थानकादरम्यान शेअर रिक्षासेवा देणारे आहेत.
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे रिक्षाचालक तर या मार्गावर सर्रास दिसतात. एमएचबी कॉलनी ते गोराई डेपोच्या दरम्यान असलेल्या झोपडपट्टीतील अनेक रहिवाशी, लहान मुले या बेदरकार रिक्षाचालकांच्या अपघातात बळी पडले आहेत. यामुळे पादचारी जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडत असतात. यात सर्वाधिक हाल होतात वृद्ध, लहान मुले आणि स्त्रियांचे. या रिक्षाचालकांना कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला भीक घातली जात नाही.
रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा बोरिवली स्थानकापासूनच सुरू होतो. येथील गोरा गांधी हॉटेलसमोर गर्दी करून उभ्या असलेल्या शेअर रिक्षा या रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण करतात. प्रवाशांची ने-आण करताना अनेक रिक्षाचालक आपापसात स्पर्धा लावतात. रेल्वे स्थानकापासूनच वेगाची ही जीवघेणी स्पर्धा सुरू होते.
लिंक रोडवरील डॉन बॉस्को जंक्शनजवळील सिग्नलची पर्वा तर कोणीच करत नाही. तिन्ही बाजूंनी गाडय़ा येत असतानाही रिक्षाचालक बेधडक रिक्षा घुसवतो. सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी या जंक्शनला वाहतूक पोलिस नसताना वाहन चालकांचे चांगलेच फावते.
‘एमएच०२यूए ४८६६’चा उद्धटपणा
बेफामपणे रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालकांना हटकले की ते कसे उद्धटासारखे वागतात, याचा अनुभव नुकताच गोराई येथे राहणाऱ्या महिलेला आला. या महिलेने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरिवली स्थानकापासून ही शेअर रिक्षा पकडली. या मार्गावरचे रिक्षाचालक सर्रास चार प्रवासी घेतात. पण, याने मागे तीन आणि पुढे दोन असे पाच प्रवासी घेतले. इतर प्रवाशांनी हरकत घेतली तरी त्याने दाद दिली नाही. त्यानंतर त्याने सुसाट वेगाने रिक्षा चालविण्यास सुरूवात केली. या शिवाय समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला तो हॉर्न वाजवून हैराण करीत होता. रिक्षाचा वेग इतका बेफाम होता की दोन वेळा बेस्ट बसला तर तीन वेळा रिक्षाशी धडक होता होता वाचली. त्यामुळे, या महिलेने त्याला वेग कमी करण्यास सांगितले. त्यावर अधिकच सुसाट वेगाने रिक्षा पळवू लागला. त्यावर इतर महिला प्रवासीही त्याला वेग कमी करण्यास सांगू लागल्या. पण, त्याने शेवटपर्यंत रिक्षाचा वेग कमी केला नाही. गोराई येथे उतरल्यानंतर महिलेने त्याची चांगलीच कानउघडणी केली. पण, हा रिक्षाचालक तिला उद्धटपणे उत्तर देऊ लागला. गोराईत आपलं कोण काय बिघडवते, या त्याच्या अरेरावी उत्तरावर तिने ‘आपण वाहतुक पोलिसांकडे तक्रार करणार असून यापुढे वेगाने रिक्षा चालविली तर याद राख, असा दम भरला. पण, त्यावर तो अधिकच चवताळला. ‘माझ्या रिक्षाचा नंबर लिहून घ्या आणि काय करायचे ते करा,’ असे उर्मट उत्तर तो देऊ लागला. या महिलेने संबधित प्रकाराची तक्रार केली आहेच. पण, त्याचा रिक्षाचा नंबरही नोंदवून ठेवला आहे. हा नंबर आहे ‘एमएच०२यूए ४८६६’.
रिक्षाचालक मद्याच्या अंमलाखाली
गोराईमध्ये बोरिवली स्थानकासाठी गोराई खाडी, सुविद्या शाळा, गोराई पूल, प्रगती या चार ठिकाणी शेअर रिक्षाचालकांचे थांबे आहेत. पण, या दरम्यान सेवा देणारे अनेक रिक्षाचालक दारू पिऊन रिक्षा चालवित असतात. गोराई खाडीच्या थांब्याच्या मागेच एक दारूचा गुत्ता आहे. कामाच्या वेळेस या गुत्त्यावर बरेच रिक्षाचालक जा-ये करीत असतात. वाहतूक अधिकाऱ्यांनी एकाच वेळी या थांब्यावर पाहणी केली तर अनेक रिक्षाचालक मद्यपान केलेले आढळून येतील.
– सुनील शिंदे, काँग्रेस कार्यकर्ते
बेस्ट बसेसच्या
फेऱ्या वाढण्याची गरज
गोराई ते बोरिवली स्थानकादरम्यान असलेल्या मर्यादित बससेवेमुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. सुविद्याजवळ मोठी लोकवस्ती आहे. पण, कुठलीही बस सुविद्यापासून सुरू होत नाही. प्रगती शाळा किंवा चारकोप या थांब्यावरून सुरू झालेल्या बस सुविद्याजवळ येईपर्यंत भरून गेलेल्या असतात. बोरिवली स्टेशन ते सुविद्यापर्यंत स्वतंत्र बससेवा सुरू झाली तर रिक्षाचालकांची अरेरावी थोडीफार कमी होईल.
विपुल जोशी, सामाजिक कार्यकर्ते