आपल्या वैशिष्टय़पूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या हापूस आंब्याची समस्त अमेरिकावासीयांना भुरळ पडली असून मुबलक उत्पादनामुळे यंदा निर्यातीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. प्रारंभीच्या दहा दिवसातच विकिरण प्रक्रिया केलेला ५२ टन आंबा अमेरिकेला रवाना झाला आहे. निर्यातदारांनी महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडे ६०० टन आंब्यावर ही प्रक्रिया करण्याची मागणी नोंदविली आहे. यामुळे फळांच्या राजासह इतर भारतीय आंबे यंदा अमेरिकेतील खवय्यांच्या जिभेचे पुरेपूर चोचले पुरविणार असल्याचे दिसत आहे.
अनेक देशांतील नागरिकांना आपल्या चवीने वेड लावणाऱ्या हापूस आंब्याची गोडी अमेरिकावासियांना सहा वर्षांपासून चाखण्यास मिळत आहे. यंदाचे हे सातवे वर्ष असून त्यात सर्वाधिक निर्यात होण्याची महामंडळाला अपेक्षा आहे. अमेरिकेन बाजारपेठेत कोणत्याही कृषी मालास प्रवेश करावयाचा असेल तर त्याला प्रथम २१ विविध निकषांचे अडथळे पार करावे लागतात. त्यात तो माल किटाणूविरहित असणे सर्वात महत्वाचे आहे. याकरिता आंब्यावर विकिरण प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याने भाभा अणू संशोधन केंद्राने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे खास केंद्राची उभारणी केली. आंब्याची जागतिक बाजारपेठ विस्तारण्याच्या उद्देशाने या केंद्राची धुरा महाराष्ट्र राज्य कृषी पणनने स्वीकारली आहे. अमेरिकेत निर्यात करावयाच्या आंब्यावर ही प्रक्रिया करावी लागत असल्याने कोकणच्या हापूसचा अमेरिका प्रवास हा नाशिकमार्गे होतो. यंदा २२ एप्रिलपासून विकिरण प्रक्रियेला सुरूवात झाली.
प्रारंभीच्या दहा दिवसातच ५२ टन आंब्यावर ही प्रक्रिया करून तो अमेरिकेला पाठविण्यात आल्याची माहिती पणनचे उपसरव्यवस्थापक प्रकाश अष्टेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. त्यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण केवळ हापूसचे असून उर्वरित केसर व बेंगलपल्ली आंब्याचा समावेश आहे. य्
ांदा आंब्यांचे मुबलक उत्पादन झाल्याने निर्यातदारांनी सुमारे ६०० टनावर ही प्रक्रिया करण्याची मागणी नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेला निर्यात झालेल्या भारतीय आंब्याचा आढावा घेतल्यास आतापर्यंत अधिकतम २६० टनची निर्यात झाली आहे. यंदा हे प्रमाण नेहमीच्या निर्यातीपेक्षा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेला जो आंबा निर्यात केला जातो, त्यावर नाशिकमध्ये प्रथम विकिरण प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया करणारे देशातील हे एकमेव केंद्र आहे. गॅमा किरणांचा मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील किडही नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते. किड रोखण्यास हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते. निर्यातदारांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन या केंद्राने जादा कामाद्वारे निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न ठेवला आहे. हापूसला अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, लॉसएन्जेल्स, शिकागो, मियामी, नेवार्ड, दलास आदी शहरांतून मागणी असल्याचे निर्यातीच्या आकडेवारीवरून लक्षात येते.
मागील सहा वर्षांतील निर्यात
अमेरिकेत हापूससह इतर काही निवडक भारतीय आंब्याची निर्यात २००७ पासून सुरू झाली. मागील सहा वर्षांत एकूण १,०७९ टन आंबा निर्यात करण्यात आला आहे. पहिल्या वर्षी म्हणजे २००७ मध्ये १५७ टन, २००८ – २६०, २००९ – १२१, २०१० – ९५, २०११ – ८४, २०१२ – २१० टन आंबा एकटय़ा अमेरिकेत निर्यात करण्यात आला आहे. यंदा म्हणजे २०१३ मध्ये प्रारंभीच्या दहा दिवसात ५२ टन आंब्याची निर्यात करण्यात यश आले आहे.