लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याने चालू गळीत हंगामातील ३६ दिवसात २०५० मेट्रीक टन उसाचे उच्चांकी गळीत केले आहे. गाळप क्षमतेच्या १६४ टक्क्याने हे ३६ दिवसातील विक्रमी गाळप आहे. जाहीर केल्याप्रमाणे प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे पहिली उचल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित सर्व शाखांमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन १२५० मेट्रीक टन असतानाही दैनंदिन गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने माजी आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळ व अधिकारीवर्गाने कारखान्याच्या मिल विभागात आधुनिकता तसेच तांत्रिक सुधारणा केली आहे. ३७ वर्षांपूर्वीची जुनी यंत्रसामग्री असूनदेखील योग्य मार्गदर्शन व आर्थिक नियोजनामुळे अत्यंत कमीतकमी खर्चात कारखान्याने यंत्रसामग्रीच्या मेंटेनन्सची कामे पूर्ण करून कारखान्याचा गळीत हंगाम १० नोव्हेंबर रोजी सुरू केला.
आजअखेर ५९,८३५ मे. टन उसाचे गाळप करून ६१,८०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा ११ इतका असल्याने साखर उताऱ्यामध्ये देसाई सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कारखान्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हंगामातील ३६ व्या दिवसापर्यंत कारखान्याने गाळप क्षमतेचा १६४  टक्के वापर करून २०२० मेट्रीक टन उसाचे उच्चांकी गाळप सुरू आहे. शुभ्र दाणेदार एल ३०, एम ३०, एस ३० अशा विविध साखरेचे उत्पादन सुरू असल्याबद्दल पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या तांत्रिक सल्लागारांनी समाधान व्यक्त केले आहे. ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी केले आहे.