मिरज दंगल.. सांगलीचे शांघाय इस्लामपूरचे पार्सल.. सोनिया गांधींचे गाव.. यातच गुरफटलेल्या महापालिका निवडणूक प्रचारात वैयक्तिक पातळीवर गेलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे नागरी समस्यांची चर्चा मात्र अभावानेच आढळत आहे. मुंबईत एकत्र नांदणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते महापालिकेच्या व्यासपीठावर एकमेकांची उणीदुणी काढण्यात गुंतली आहेत.
महापालिकेसाठी रविवार, दि. ७ जुलै रोजी मतदान होत असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ‘स्टार’ प्रचारकांनी रंगत आणली आहे. राष्ट्रवादीची धुरा ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांच्याकडे, तर काँग्रेसची धुरा मदन पाटील यांच्याकडे आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात प्रचारसभांनी चांगलीच वातावरणनिर्मिती केली आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी या सत्तेच्या दावेदार असणाऱ्या राजकीय पक्षांना स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी आघाडी यांनी काही प्रभागांत आव्हान दिले असून त्यांच्याही सभा गाजू लागल्या आहेत. या आघाडीचे नेतृत्व भाजप आमदार संभाजी पवार व जनता दलाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील हे करीत आहेत. याशिवाय कुपवाड येथे नगरसेवक धनपाल खोत यांनी या तीनही गटांपासून अलिप्त राहून स्वतंत्र आघाडी स्थापन केली असून, कुपवाडपुरती मर्यादित असलेली त्यांची ताकद कितपत यशस्वी ठरते हे निकालानंतर स्पष्ट होईल.  
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचेही उमेदवार स्वतंत्रपणे काही प्रभागात मदानात उतरले आहेत. लॉटरी लागली तर  या पक्षाचे सदस्यही महापालिका सभागृहात दिसणार आहेत.
काँग्रेसच्या प्रचारासाठी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवक काँग्रेस आयचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आणि माजी मंत्री मदन पाटील हे व्यासपीठ गाजवत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील,  गृहमंत्री आर. आर. पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिल्या टप्प्यात मदान मारले आहे.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे यांना पाचारण केले आहे, तर राष्ट्रवादीने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना मदानात उतरविण्याची तयारी केली आहे.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीने महापालिकेसाठी ५०० कोटींचा निधी आणल्याचा गवगवा केला. मात्र काँग्रेसने ५०० कोटींमध्ये सांगलीचे शांघाय झाले असते असा आरोप करताच निधीचा आकडा ३०० कोटींवर आला. जातीयवादी भाजपशी अंतर्गत युती असल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीने मिरज दंगलीबाबत मौन बाळगले होते, मात्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दंगलीचे खरे लाभार्थी कोण, असा प्रश्न करून भाजपवर निशाणा साधला.
पिण्याच्या पाण्यासाठी वारणा पाणी योजना, डासमुक्त सांगली आणि शेरीनाला हे जनतेच्या जिव्हाळय़ाचे प्रश्न मात्र सातत्याने चच्रेत आले असले, तरी सोडविण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय का घेतले गेले नाहीत याची उत्तरे मात्र कोणीच देत नाहीत. विकासाचे गाजर सर्वजणच दाखवत आहेत. तीनही शहरातील रस्त्यांची अवस्था, रहदारीची समस्या, भाजी मंडईचा प्रश्न, रस्तेरुंदीकरणाची रखडलेली कामे, शहराबाहेर विस्तारलेल्या नागरी वस्त्यांचे प्रश्न याबाबत कोणताही राजकीय पक्ष ठोस कार्यक्रम घेऊन पुढे आलेले नाहीत.
‘इस्लामपूरचे पार्सल परत पाठवा’ असे आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादी विरोधकांना ‘सोनिया गांधींचे गाव कोणते?’ असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे. याचे उत्तर कोण देणार? स्थानिक प्रश्नांपेक्षा राजकीय कुरघोडय़ात राजकीय पक्ष अडकल्याने नागरी समस्यांचा मात्र फारसा ऊहापोह होत नाही.
सांगलीला दोन लाल दिवे
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर सुरेश पाटील यांना खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष करून लाल दिव्याची गाडी दिली. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही माजी मंत्री मदन पाटील यांना उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले. निवडणूक आचारसंहिता लागू झाली असताना ही घोषणा कितपत योग्य याचा विचार कोण करणार, असा प्रश्न सर्वसामान्य सांगलीकर विचारत आहेत.