राज्यातील जनतेला चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्यात, यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला असून, मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी वर्ग ३ चे ५ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधीक्षकांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही भरती होणार असून, येत्या ऑक्टोबपर्यंत आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी-अधिकाऱ्यांचा तुटवडा दूर होईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली.
बोरी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना बुधवंत, जिल्हा परिषद सदस्य मेघना साकोरे-बोर्डीकर, जिंतूर पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई जाधव, उपसभापती शांताबाई गायकवाड, सदस्या लक्ष्मीबाई कणकुटे, बोरीच्या सरपंच इंदूबाई काळेबाग, जिंतूरचे नगराध्यक्ष सचिन गोरे, किरण सोनटक्के, रणजित मकरंद, डॉ. प्रफुल्ल पाटील, अजय चौधरी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
किशोरवयीन मुलामुलींसाठी साप्ताहिक लोह व फॉलिक अॅसिड गोळय़ा वाटप कार्यक्रमाची सुरुवात परभणी जिल्ह्यात येत्या बुधवारपासून (दि. ७) होणार असल्याची माहिती आरोग्य प्रा. फौजिया खान यांनी दिली.
राज्यमंत्री खान म्हणाल्या, देशात किशोरवयीन मुलामुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण फार जास्त आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन फॉलिक अॅसिड पुरवणी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शासकीय, शासन अनुदानित आणि नगरपालिका शाळेतील वर्ग ६ वी ते १२वीमध्ये असलेल्या मुलामुलींना दर सोमवारी या गोळय़ांचे वाटप केले जाईल. हा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारावा यासाठी गेल्या ३ वर्षांत ५० कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला. अस्थिव्यंग्य रुग्णालय सुरू करण्यात आले. रक्तविघटीकरण युनिट सुरू करण्यात आले असून त्याचा रुग्णांना लाभ होत आहे. नवीन स्त्री रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मिटला असून ते लवकरच मार्गी लागेल, नेत्ररुग्णालयही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेला मनापासून चांगल्या सेवा द्या, त्यांच्या तक्रारी राहणार नाही, याची काळजी घ्या, आपल्याला आरोग्याच्या क्षेत्रात परभणी जिल्हा राज्यात नंबर वन करायचा असून आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे,’ असे आवाहन खान यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. के. पवार यांनी केले.

Story img Loader