दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया- चांदाफोर्ट मार्गावर राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत अख्खी वरातच विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळल्याने त्यातील लोकांवर कारवाई करण्यात आली. विना तिकीट प्रवास करणाऱ्या वऱ्हाडय़ांना नागभीड रेल्वे स्थानकावर पकडल्यानंतर स्टेशन मास्तरने चक्क नवरदेवाला ओलीस ठेवून जोवर प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे भरणार नाही तोवर सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे वऱ्हाडय़ांच्या तिकिटाचे पैसे भरून नवरदेवाची सुटका करावी लागली. ही घटना मंगळवारी सकाळी नागभीड रेल्वे स्थानकावर घडली.
विनातिकीट प्रवासी आणि बुकिंग न करता लगेजच्या प्रकरणांना आळा घालण्याकरता सहायक वाणिज्य व्यवस्थापक बी.बी. साहू यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाने गोंदिया- चांदाफोर्ट मार्गावर तपासणी मोहीम राबवली. त्यात ११ जून रोजी चांदाफोर्ट- गोंदिया पॅसेंजरमध्ये तपासणी करण्यात आली.
या गाडीतून सिंदेवाही येथे राहणाऱ्या प्रमोद बापूजी मेश्राम यांच्या लग्नाची वरात जात होती. चंद्रपूर-गोंदिया या चांदा फोर्ट रेल्वेने सिंदेवाही येथील वरात नागभीड येथे जाण्यासाठी गाडीत बसली. अध्र्या तासाने नागभीड रेल्वे स्थानकावर वऱ्हाडी उतरताच स्टेशन मास्तरने या सर्वाकडे तिकिटाची विचारणा केली. जवळपास ३५ वऱ्हाडय़ांकडे तिकीटच नव्हते. त्यामुळे स्टेशन मास्तरने ३५ जणांना पकडण्याऐवजी थेट नवरदेवालाच ओलीस ठेवले. जोवर वऱ्हाडय़ांचे तिकीट भरणार नाही तोवर सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर सर्वच वऱ्हाडी नाहीत, २० ते २५ जण असतील. त्यांचे तिकीट व दंड भरतो, असे नवरदेवाने सांगितले. मात्र, साहू यांनी सर्वाचीच तिकीट व दंड भरावा लागेल नाही तर सोडणार नाही, असे बजावले. यावर नवरदेवाने ३५ लोकांचा दंड व तिकीट, असे ९ हजार ६२५ रुपये भरल्यानंतर या सर्वासह नवरदेवाला सोडण्यात आले.
वरातीतील ६४ प्रौढ आणि २० मुले विनातिकीट असल्याचे आढळल्यानंतर त्यांना ब्रम्हपुरी स्थानकावर उतरवून त्यांच्यावर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. त्यादरम्यान नवरदेव प्रमोद मेश्राम यांनी दंड भरण्यास नकार तर दिलाच, शिवाय रेल्वे स्थानकाच्या परिसरात तोडफोड करून वरातीतील काही लोकांना तेथून जबरीने पळवून लावण्यातही भाग घेतला.
या घटनेची माहिती इतवारीच्या शासकीय रेल्वे पोलिसांना देण्यात आली. याच पथकाने या मार्गावरील ३ गाडय़ांमध्ये अचानक तपासणी करून एकूण ६१ विनातिकीट प्रवासी आणि बिना बुकिंगचे सामान पाठवण्याची ३ प्रकरणे पकडून १७ हजार ६६० रुपयांचा दंड वसूल केला.
या पथकात नागभीड व नागपूर येथील तिकीट निरीक्षक, कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाचे जवान यांचा समावेश होता.