शहरातील मोडकळीस आलेल्या मंडयांच्या पुनर्विकासाबाबत प्रशासनाने तयार केलेल्या धोरणात त्रुटी असल्याचा आरोप नगरसेवकांनी केल्यानंतर सुधार समितीने ते फेरविचारार्थ प्रशासनाकडे परत पाठविले. मात्र या धोरणात नेमक्या काय त्रुटी आहेत हे नगरसेवकांना सांगता आले नाही. परिणामी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंडयांच्या धोरणाचा मुहूर्त तिसऱ्यांदा टळला.
मंडयांच्या पुनर्विकासाचे धोरण यापूर्वी महापालिका आयुक्तांनी दोन वेळा तयार केले होते. दोन्ही वेळेला ते फेटाळले गेल्याने दफ्तरी दाखल झाले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा एकदा शुक्रवारी सुधार समितीपुढे मंडयांच्या पुनर्विकासाचे सुधारित धोरण सादर केले होते. मात्र या धोरणात त्रुटी असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. मात्र त्यात नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत हे नगरसेवकांना सांगता आले नाहीत. भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी हे धोरण फेरविचारार्थ प्रशासनाकडे परत पाठविण्याची मागणी केली आणि सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ती उचलून धरली. नगरसेवकांच्या मागणीमुळे अखेर सुधार समिती अध्यक्ष राम बारोट यांनी हे धोरण फेरविचारार्थ प्रशासनाकडे परत पाठविले. मंडया मोडकळीस आल्यामुळे धोरणात फेरबदल करून ते नव्या वर्षांत तातडीने समितीपुढे सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.   

Story img Loader