नगर जिल्ह्य़ातील नेत्यांनी दबाव निर्माण करून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यात २५०, तर उजव्या कालव्यातून ४५० क्युसेक वेगाने पाणी अन्यत्र वळविले. परिणामी जायकवाडी जलाशयातील पाण्याचा ओघ मंगळवारी ११९० क्युसेकवरच खाली आला. गेल्या दोन दिवसात पाण्याची आवक चांगली होती. त्यामुळे धरणाची पाणीपातळी १४.९८ टक्क्य़ांपर्यंत वधारली. जायकवाडीतील जिवंत साठा आता ३२५.०३३ दलघमी झाला आहे.
नाशिक व नगर जिल्ह्य़ात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणे ६०-७० टक्क्य़ांपेक्षा अधिक भरली. ओझरखेड वगळता अन्य सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र, जायकवाडीत पाणी सोडण्याऐवजी वरच्या धरणातील पाणी कालव्याद्वारे वळविले जात आहे. पालखेड धरण १०० टक्के भरले. भावली ९९.५५ टक्के, भंडारदरा ९३.२४ टक्के, निळवंडे ९७.४७ टक्के भरले. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातही ८७.५५ टक्के पाणीसाठा आहे. अन्य धरणांमध्येही ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाणीसाठा असूनही हे पाणी गोदावरी पात्रात सोडण्याचा वेग कमी करण्यात आला.
मंगळवारी नागमठाण येथे केवळ १८९० क्युसेक वेगाने पाणी येत होते. पाण्याची आवक घटल्याने धरणाची पाणीपातळी जेमतेम १५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचली. वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी जलदगती कालव्याद्वारे ७५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पाणी पळविले जात असल्याची तक्रार मराठवाडय़ातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार करूनही त्याचा उपयोग होत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. पाणी संघर्षांची धार दिवसेंदिवस वाढतच आहे. नुकत्याच आयोजित पाणी परिषदेत या अनुषंगाने ९ ऑगस्टला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जायकवाडीत नवीन पाण्याची आवक घटली
नगर जिल्ह्य़ातील नेत्यांनी दबाव निर्माण करून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यात २५०, तर उजव्या कालव्यातून ४५० क्युसेक वेगाने पाणी अन्यत्र वळविले. परिणामी जायकवाडी जलाशयातील पाण्याचा ओघ मंगळवारी ११९० क्युसेकवरच खाली आला.
First published on: 07-08-2013 at 01:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduce inward of new water in jayakwadi