डॉ. प्रताप रेड्डी यांचे प्रतिपादन
आरोग्य पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला मोठा हातभार लागू शकतो. परंतु, त्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना ‘व्हिसा’साठी अधिक पैसे मोजावे लागतात. नियमित पर्यटन आणि आरोग्य पर्यटन यात फरक आहे. किफायतशीर दरात स्थानिक पातळीवर चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांवरील हा आर्थिक बोजा कमी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अपोलो हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी रेड्डी यांनी केले. अशोका ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे नाशिक येथे उभारण्यात आलेल्या १२५ खाटांचे मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यास ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, नगरसेविका सुनिता निमसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आरोग्य सेवेच्या जागतिक नकाशावर भारताला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, तरी देखील संपूर्ण देशभरात आरोग्य सेवा समानसाध्य होण्यासाठी झगडावे लागत आहे. नाशिकच्या रुग्णालयात ‘इ आयसीयू’ सेवेचा अंतर्भाव असल्याने गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णावर चोवीस तास देखरेख ठेवणे शक्य होईल, असे रेड्डी यांनी नमूद केले. अपोलो हॉस्पिटल १२० देशांमधील रुग्णांना सेवा देत असून जगात प्रथम ‘सॉलीड ऑर्गन ट्रान्सप्लान्ट’ सुविधा असल्याचा मान मिळाला आहे. आतापर्यंत संस्थेच्या रुग्णालयांनी १५२००० शस्त्रक्रिया तर १२५००० ‘अ‍ॅन्जिलोप्लास्टी’ करण्यात आल्या आहेत. नाशिकच्या रुग्णालयातील सुविधांविषयी रेड्डी यांनी माहिती दिली.