विद्यार्थ्यांची बोगस हजेरी दाखवून तुकडय़ा टिकवण्याबरोबरच बोगस हजेरीपटाच्या साहाय्याने शालेय पोषण आहारातही गैरव्यवहार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका विद्यालयात सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत आढळून आले आहे. या शाळेत तब्बल १४३ विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती आढळून आली, तर प्रयोगशाळेत ४० क्विंटल तांदूळ आढळला. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिका-यांनी तारकपूरमधील सेंट झेव्हिअर्स शाळेच्या मुख्याध्यापिकेस कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शालेय पोषण आहार योजना व राष्ट्रीय माध्यान्ह भोजन योजनेतील अतिरिक्त धान्यसाठय़ाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिका-यांनी नोटीस धाडली असली, तरी माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी आपल्याच अधिकाऱ्याच्या चौकशीत आढळून आलेल्या बोगस हजेरीच्या किंवा विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती दाखवल्याबद्दलच्या अहवालावर अद्यापि काहीच कार्यवाही केलेली नाही.
शाळेतीलच एका विद्यार्थ्यांचे पालक विजयानंद गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे केलेल्या लेखी तक्रारीवर ही चौकशी करण्यात आली होती. पहिल्यांदा केलेल्या तक्रारीची विभागाने दखलच घेतली नव्हती. दुस-यांदा २९ ऑक्टोबरला केलेल्या तक्रारीची तब्बल सव्वा महिन्याने कार्यवाही करण्यात आली. बोगस हजेरीच्या साहाय्याने तुकडय़ा दाखवल्या जातात व शालेय पोषण आहार योजनेतील धान्यसाठा काळय़ा बाजारात विकला जातो, अशी तक्रार होती. शिक्षणाधिका-यांनी त्यावर के. एन. चौधरी (उपशिक्षणाधिकारी माध्यमिक), अनिल शिंदे (गटशिक्षणाधिकारी) व बिराजदार (अधीक्षक, पोषण आहार, नगर) या तिघांची चौकशी समिती नेमली. या समितीने ११ डिसेंबरला सेंट झेव्हिअर्स शाळेस भेट दिली व दुसऱ्या दिवशी (१२ डिसेंबर) प्राथमिक शिक्षणाधिका-यांना अहवाल सादर केला.
संबंधितांनी या शाळेला भेट दिली तेव्हा शाळेत इयत्ता सहावी व सातवीच्या प्रत्येकी दोन तुकडय़ा एकाच वर्गात बसवलेल्या आढळल्या. वर्गात २९ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद नव्हती तरीही हजेरीपत्रकावर त्यांच्या उपस्थितीची व त्यांना राष्ट्रीय माध्यान्ह भोजन योजनेचा लाभ दिल्याची नोंद होती. इयत्ता पाचवी ते आठवीच्या नोंदवहीत ३४१ विद्यार्थ्यांची नोंद होती, प्रत्यक्षात १९८ विद्यार्थीच उपस्थित होते, म्हणजे विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती लावण्यात आली असावी. तांदळाचा प्रत्यक्षातील साठा ३९ क्विंटल ५० किलो होता, नोंदवहीत मात्र शिल्लक साठा ४२ किलो १५० ग्रॅम असा उल्लेख आढळला, यावरून नोंदवहीत बनावट नोंदी होत असल्याचे दिसते. भेटीच्या दिवशी १५ किलो आहार शिजवला होता, नोंदवहीत मात्र ४९ किलो ९५० ग्रॅम शिजवल्याची नोंद आढळली.
यावरून विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती दाखवून शालेय पोषण आहार व राष्ट्रीय माध्यान्ह भोजन योजनेतील तांदूळ शिजवला गेल्याचे दाखवले गेले आहे. प्रयोगशाळेत ५० किलोच्या ७९ पोती तांदूळ साठा आढळला, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका जे. वाय. शिंदे यांना खुलासा मागणारी कारणे दाखवा नोटीस ३० डिसेंबरला बजावली व सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे.
याच चौकशी समितीने आणखी एक स्वतंत्र अहवाल माध्यमिक शिक्षणाधिका-यांना दिला आहे. वर्गशिक्षकांनी केलेल्या बोगस उपस्थितीची मुख्याध्यापिकांनी पडताळणी केली नाही, याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे अहवालात नमूद केले आहे. मात्र या अहवालावर माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी अद्याप काहीच कार्यवाही केली नाही.

Story img Loader