नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तुळजापूरच्या भवानी माता मंदिरातून ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे दरवाज्यातच झालेल्या चेंगराचेंगरीने मांढरदेव दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.
आठ वर्षांपूर्वी २५ जानेवारी २००५ रोजी मांढरदेवच्या यात्रेतही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. यात्रा भर रंगात असताना दुपारी मोठा गोंधळ झाला. काय झाले हे कळायच्या आत सगळीकडे पळापळ झाली आणि यात्रा विस्कटली. प्रत्यक्ष घटना आणि त्यापाठी आलेल्या विविध अफवा-भीतीने लोक जीव वाचविण्यासाठी पळू लागले. यात अनेक जण एकमेकांच्या अंगावर कोसळले, काही घसरले, पायाऱ्यांवरून खाली पडले, चेंगरले गेले. या गोंधळातच काही दुकानातील वीज वाहक तारा तुटल्याने काहींना विजेचा झटका बसला. या साऱ्या दुर्घटनेत तब्बल २९१ भाविक मरण पावले, तर हजारभर जखमी झाले. यात्रेतील या मोठया दुर्घटनेने सारेच सुन्न झाले. यात्रेतील नियोजनाची लक्तरे निघाली. या दुर्घटनेनंतर सरकारच्यावतीने विविध आयोग-समित्या नेमून संबंधित घटनेची चौकशी करण्यात आली. राज्यातील अन्य देवस्थानांना, तिथल्या यात्रावेळी भाविकांच्या गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत सूचना करण्यात आल्या. पण या साऱ्या शिफारशी, सूचना केवळ कागदावरच राहिल्याचे तुळजापूरच्या घटनेने जाणवत आहे.
आजची चेंगराचेंगरीची घटना तुळजापूरला झाली, पण त्याची धीरगंभीर स्वरातील चर्चा वाई-मांढरदेव परिसरात सुरू होती. आठ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घटेनेचे संदर्भ देत अनेकजण कटू आठवणींना उजाळा देत होते. याचबरोबरीने, गेल्या आठ वर्षांत आम्ही काहीच शिकलो नाही याबद्दल सरकारी निष्क्रियतेला शिव्याही घालत होते. शारदीय नवरात्रोत्सवाच्यानिमित्ताने आजपासून मांढरदेववर काळुबाईची यात्रा सुरू झाली आहे. शेकडो भक्त दर्शनासाठी आले होते. या साऱ्या गर्दीत आज दिवसभर ‘त्या’ घटनेचीच चर्चा सुरू होती.
तुळजापूरच्या घटनेने मांढरदेवच्या आठवणी ताज्या!
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तुळजापूरच्या भवानी माता मंदिरातून ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे दरवाज्यातच झालेल्या चेंगराचेंगरीने मांढरदेव दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.
First published on: 06-10-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Refresh of mandhardev memoir of tuljapur incident