‘प्रगल्भ राजकीय नेता’ अशी महाराष्ट्राला ओळख असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राच्या अनावरणानिमित्त गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या साक्षीने जिल्हा परिषद अध्यक्षा नाहिदाबानो पठाण व उपाध्यक्ष विजया चिकटगावकर यांनी एकमेकींची उणीदुणी काढली! पत्रिकेवरून निर्माण झालेला वाद पराकोटीला गेला आणि मंत्री पाटील यांना हे रंगलेले मानापमान नाटय़ पाहावयास मिळाले!
मंत्री पाटील जिल्हा परिषदेत कार्यक्रमानिमित्त आले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी त्यांच्यासमोर जि. प.ने गेल्या वर्षभरात केलेल्या वेगवेगळ्या चांगल्या योजनांचे सादरीकरण केले. त्यानंतर लगेच जि. प. अध्यक्षा पठाण बोलण्यास उठल्या आणि त्यांनी थेट सवाल केला, हा कार्यक्रम प्रशासनाचा की राष्ट्रवादी काँग्रेसचा? या कार्यक्रमासाठी काढलेल्या पत्रिकेवर उपाध्यक्षांचे नाव विनीत म्हणून प्रकाशित करण्यात आले होते. अध्यक्षांना डावलून पत्रिका कशी छापली गेली, हा प्रश्न दोन दिवसांपासून जि. प.मध्ये चर्चेत होता. या मुद्दय़ावर जि. प. अध्यक्षा पठाण यांचा आवाज वाढला आणि ‘सीईओ’ बनकर यांनी कार्यक्रम प्रशासनाचा असला तरी पत्रिका प्रशासनाने छापली नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाद वाढला.व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, आमदार सतीश चव्हाण आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यापैकी कोणी तरी एकजण अध्यक्षांना ‘बसा हो खाली’ असे म्हणाले. त्याला शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. हा जि. प. अध्यक्षांचा अवमान आहे, असे सांगितल्याने सभागृहात गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे तैलचित्र अनावरण कार्यक्रमात गटबाजीतून निर्माण झालेले मानापमान नाटय़ ग्रामविकास मंत्र्यांना पाहावे लागले. त्यांनी भाषणातही पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. चांगले काम करणारे अधिकारी या जिल्ह्य़ात दिले आहेत.
त्यांच्याकडून हातोटीने अधिक दोन कामे करून घेण्याऐवजी आपापसात मतभेद होत असतील, तर ते दुर्दैवी आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. कार्यक्रमानंतर अध्यक्षांच्या दालनात येण्याचे ग्रामविकास मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले होते. तथापि, उपाध्यक्षांच्या दालनातच त्यांनी चहापान घेतले. यावर अध्यक्षा पठाण यांनी मंत्र्यांनी शिष्टाचार पाळला नाही, असे पत्रकारांना सांगितले. तसेच ‘सीईओ’ बनकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader