नाशिक प्रादेशिक परीवहन कार्यालयाकडून येथे महिन्यातून केवळ एकदा घेतल्या जाणाऱ्या शिबीरात १०० शिकाऊ, ६५ पक्के तर हलके वाहन चालविणाऱ्या २१ अर्जदारांची चाचणी घेऊन फक्त त्यांनाच वाहन चालविण्याचा परवाना वितरित केला जाणार असल्याचे समजल्यानंतर घोटीसह तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने आलेल्या युवकांनी्र संताप व्यक्त करत शिबीरावर बहिष्कार टाकला. वाहन चालकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत शिबीरासाठी येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी घेऊन त्यांना वाहन परवाना देण्याची मागणी करत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शिबीर होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे या शिबीराचे कामकाज सुरू होऊ शकले नाही.
इगतपुरी तालुक्यासाठी नाशिक प्रादेशिक परीवहन कार्यालयाकडून दरमहा १२ तारखेला घोटीजवळ खंबाळे विश्रामगृहात शिबीर होत असते. या शिबीरासाठी शिकाऊ परवाना काढण्यासाठी युमारे ३०० तर पक्क्या परवान्यासाठी २०० नागरीक आले होते. मात्र या शिबीरात शिकाऊ १०० आणि ६५ जणांची पक्क्या परवान्यासाठी वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर उपस्थित तरूण संतप्त झाले. परवान्यासाठी आलेल्या सर्वाची एकाच दिवशी चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. परंतु शासनाच्या नवीन परीपत्रकानुसार ते शक्य नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर नागरिकांनी या शिबीरावर बहिष्कार टाकत कामकाज सुरू होऊ न देण्याचा इशारा दिला. संतप्त वाहन चालकांनी परीवहन अधिकाऱ्यांना घेराव घालत या ठिकाणी उपस्थित सर्वाची चाचणी घेऊन त्यांना परवाना देण्याची मागणी केली. परीवहन अधिकाऱ्यांनी याचे सर्व अधिकार वरिष्ठांना असल्याने आपली कैफियत त्यांच्याकडे मांडण्याचे आश्वासन दिले. यावेळी वाहन निरीक्षक आर. एस. पाटील, सहाय्यक निरीक्षक जमादार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी इगतपुरीचे उपनगराध्यक्ष सतीश कर्पे, अशोक मुनोत, संजय आरोटे आदी उपस्थित होते.