बुलढाणा जिल्ह्य़ातील जळगाव जामोद व १४० गावांसाठीची बहुप्रतीक्षित प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला शासनाने हिरवी झेंडी दिली. यासाठी जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून या भागातील खारपाणपट्टय़ा व किडनी आजाराचा संबंध दर्शविणारी स्थिती शासनाचे कार्यासन अधिकारी राजेंद्र कुमटगी यांना समजावून सांगण्यात आली .त्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करून योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
खारपाणपट्टय़ासाठी संजीवनी ठरणाऱ्या या योजनेला सदस्य सचिव मजीप्रा यांनी १३ सप्टेंबर २०१२ रोजी तांत्रिक मान्यता दिलेली होती व योजनेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर केलेला होता.
तो प्रस्ताव प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी शासनाच्या विचाराधीन होता. सलग तीन वर्ष राज्य शासनाकडे तगादा लावून आमदार कुटे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. शासनानेही खारपाणपट्टय़ातील १४० गावांमधील लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न गंभीर समजून तीन वर्षांनंतर या योजनेला अखेरची मान्यता दिली.
 जळगांव जामोद १४० गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २२२ कोटी २२ लाख ९१ हजार ४०० इतक्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रक आराखडय़ास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यात काही अटींचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात यावी. यासह १८ अटी नमूद करण्यात आल्या असून, या संबंधीचा जी.आर.शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. योजनेला मंजुरी मिळाल्याची बातमी मिळताच जळगाव जामोद शहरात भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. संग्रामपूर, शेगाव येथेही कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. महत्त्वाकांक्षी ही योजना जीवनदायी ठरणारी आहे.

Story img Loader