चारित्र्यहननाच्या मुद्यावरून अमरावतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यात पेटलेले वाक् युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नसून शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नावाचा गैरवापर करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी दिला आहे.
काल-परवा एका वृत्तवाहिनीच्या चित्रीकरणादरम्यान नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात अडसुळांच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करताना अनंदराव अडसूळ यांच्यासह शिवसैनिकांच्या विरोधात विनयभंग, अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणे यासारखे गुन्हे दाखल केले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खोटी तक्रार दिल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली. शिवसेना आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी, या विषयावर अडसूळ यांच्या बाजूने उभे ठाकलेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटानेही नवनीत राणा यांनी उपस्थित केलेला चारित्र्यहननाचा विषय पेटता ठेवण्याची धडपड चालवली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील इतर महिला चारित्र्यसंपन्न, तर नवनीत राणा चारित्र्यहीन, असा आनंदराव अडसूळ यांच्याकडून होत असलेला अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही, असा दम सुरेखा ठाकरे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता शिवसेनेच्या सहकार्याने स्थापन झाली आहे. आनंदराव अडसूळ यांनी अनेक वेळा आपल्या भाषणांमध्ये सुरेखा ठाकरे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आपल्या पाठिंब्यामुळेच झाल्या, असा उल्लेख केला आहे. या उल्लेखांमुळे सुरेखा ठाकरे यांची अडचण होऊ लागली आहे. होय, शिवसेनेमुळेच जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आली, हे खरे आहे, पण हा विषय जिल्हा परिषदेपुरता आहे. लोकसभेच्या निवडणुकीशी त्याचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही ठामपणे नवनीत राणा यांच्या पाठीशी आहोत. अडसूळ यांचा पराभव आणि नवनीत राणा यांचा विजय, हेच आमचे लक्ष्य आहे, पण जिल्हा परिषदेतील युतीचा विषय काढून आनंदराव अडसूळ हे आपल्या नावाचा गैरवापर करीत आहेत. यापुढे तो त्यांनी करू नये. सत्ता सोडण्याचे आदेश पक्षाने दिले, तर तात्काळ पदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी आहे, असे सुरेखा ठाकरे यांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती आहे. जोपर्यंत ही युती तुटत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्याने राणा यांच्या वर्तुळाची गोची झाली आहे. काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीच्या विविध गटांनी वेगळे सूर काढण्यास सुरुवात केली आहे. मेळघाटात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. नुकतीच नवनीत राणा यांनी मेळघाटचा दौरा केला तेव्हा राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला अजूनही पूर्णपणे सूर गवसलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांचा उघड विरोध, काँग्रेसचा असहकार, विविध गटांकडून केली जाणारी कोंडी, यातच आता शिवसेनेने विरोधात उघडलेली आघाडी यामुळे राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Story img Loader