मोबाईल, इंटरनेट व बाजारात येत असलेल्या नवनवीन माध्यमांनी माहितीचे महाजाल उघडे केले असले तरी, या नवीन माध्यमांनी माणसा माणसातील नाती, प्रेम, जिव्हाळा संपवून टाकला आहे, अशी खंत मुंबईतील प्रसिध्द शल्यविशारद डॉ. वि. ना. श्रीखंडे यांनी रविवारी येथे व्यक्त केली.
ब्राम्हण सभेतर्फे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तारा नाईक यांना धन्वंतरी तर नेत्रशल्य विशारद डॉ. अनघा हेरूर यांना भिषग्वर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. उल्हास कोल्हटकर, मंगला कुलकर्णी, गजानन जोशी उपस्थित होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, धनादेश देऊन दोन्ही सत्कारमूर्तीना गौरविण्यात आले.
टीव्ही, मोबाईलच्या चक्रव्युहात आताचा माणूस अडकून पडला आहे. प्रेम, स्नेह, जिव्हाळा या गोष्टी या माध्यमाने संपुष्टात आणल्या आहेत. सुसंवाद संपला आहे. प्रत्येक माणसाने आपले घर म्हणजे तुरुंग करून ठेवला आहे. हेच चित्र रूग्ण आणि डॉक्टरच्या नात्यात दिसत आहेत. यापूर्वी डॉक्टर रूग्णांची आस्थेने चौकशी करीत असत. आता थेट अतिदक्षता कक्षातच डॉक्टर, रूग्ण भेटत आहेत. त्यामुळे रूग्ण आणि डॉक्टरांमधील जिव्हाळा संपला आहे.  पैसे दिल्याशिवाय कोणतीच प्रवेश प्रक्रिया होणार नसेल तर होणाऱ्या वाईटा विषयी ओरडून उपयोग काय? पैशाचे महत्व वाढविण्यात आल्यामुळे ही परिस्थिती सर्वत्र दिसत आहे. या समाजात आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून प्रामाणिकपणे सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अनघा, डॉ. तारा यांच्यासारख्या व्यक्ती आहेत. म्हणून हा समाज गतीमान होत आहे असे डॉ. श्रीखंडे म्हणाले.   

Story img Loader