कळंबोली वसाहतीमधील चार उद्यानांमध्ये सिडकोने ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी सिडको ४५ लाख रुपये खर्च करत आहे. मात्र कामोठेतील ज्येष्ठ नागरिक गेल्या दोन वर्षांपासून उद्यानाबाबत उपेक्षित राहिले आहेत.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी प्रत्येक सिडको वसाहतीमधील उद्यानांमध्ये विरंगुळा केंद्रे उभारावीत, असे आदेश दिले. या आदेशानंतर उद्यानात विरंगुळा केंद्र उभारता येत नाही या नियमाची आडकाठी निर्माण झाली होती. परंतु हा नियम मोडीत काढून तो बदलण्यात आला. त्यानंतर कळंबोली येथील उद्यानात विरंगुळा केंद्राचे काम सुरू झाले. सेक्टर २, ६, ८ व १० येथील उद्यानांमध्ये ही विरंगुळा केंद्रे असणार आहेत. एका विरंगुळा केंद्रामध्ये किमान दहा ते पंधरा ज्येष्ठ नागरिक एकाच वेळी बसू शकतात असे येथे नियोजन आहे. हे काम पाच महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यानंतर ही विरंगुळा केंद्रे नागरिकांसाठी खुली होतील.
कामोठे दोन वर्षांपासून उद्यानाच्या प्रतीक्षेत
कामोठे नोडमध्ये सिडकोचे एकही उद्यान नाही. येथील ज्येष्ठ नागरिक रस्त्याकडेच्या पदपथावर बसून आपल्याला हक्काची जागा मिळावी यासाठी सिडकोकडे गेल्या अनेक वर्षांपासून येथील ज्येष्ठ नागरिक संस्था पाठपुरावा करीत आहेत. सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आठ महिन्यांत विरंगुळा केंद्र उभारू, असे आश्वासन दिले होते. त्याला दोन वर्षे उलटली. परंतु उद्याने काही उभारली गेली नाहीत. त्यानंतर मात्र अजूनही सिडको एकही उद्यान कामोठेमध्ये उभारू शकली नाही. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी या विरंगुळा केंद्राची मागणी केली ते अजूनही भाटिया यांच्या वचनपूर्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष एन. एस. करंदीकर यांनी सांगितले.
अस्तित्वात असलेल्या उद्यानांची दुर्दशा
विरंगुळा केंद्राची योजना कळंबोळीकरांसाठी नवीन असली तरीही सध्या कळंबोलीतील उद्यानांची अवस्था बिकट आहे. या उद्यानांमध्ये रात्रीचे दिवे बंद असतात, त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. बसण्यासाठी बाके आहेत, तीही मोडलेली. खेळण्यासाठी खेळणी आहेत, पण ती तुटलेली अशी येथील परिस्थिती आहे.
नागरिकांनी येथे शतपावली व पहाटे चालण्यासाठी ट्रॅक आहे, परंतु रखवालदाराच्या नावाने बोंब आहे. दिवे नसल्याने रात्रीचा काळोख असल्याने ही उद्याने मद्यपींच्या टोळ्यांसाठी सुरक्षित आहेत.
आधी ही उद्याने नागरिकांसाठी सिडकोने सुरक्षित करावी, येथे पायाभूत सुविधा पुरवाव्यात, त्यानंतर उद्यानांमध्ये विरंगुळा केंद्रे उभारल्यास त्याचा लाभ ज्येष्ठांना घेता येईल, असे मत ज्येष्ठ नागरिक पांडुरंग गौंडळकर यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader