अरुणाचल प्रदेशातून मुले आणि महिलांचे अपहरण होऊ नये म्हणून काम करणाऱ्या पद्मश्री बिन्नी यांगा, अंमली पदार्थाच्या विरोधात मोहीम राबविणाऱ्या आईनी तालोह, मणिपूरला सेंद्रिय शेतीचे राज्य बनविण्याचे काम करणाऱ्या समाजसेवक ओ इंदिरा ओईनाम, आसाममध्ये काळी जादूच्या विरोधात काम करणाऱ्या बिरूबाला राभा अशा भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या १४ कर्तृत्ववान महिलांचे दर्शन ठाणेकर नागरिकांना छायाचित्रांच्या माध्यमातून घडणार आहे. ठाण्यातील फोटो सर्कल सोसायटी संस्थेच्या वतीने शुक्रवार ७ ते रविवार ९ मार्चदरम्यान ठाण्यातील कलाभवनामध्ये ‘विद्युल्लता’ या छायाचित्र प्रदर्शनातून या महिलांचे दर्शन होणार आहे.
फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने महिला दिनानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांची माहिती देण्यासाठी ‘विद्युल्लता’ हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करत असून यंदादेखील पूर्वाचलातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर या राज्यांतील १४ तर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, नगर, जळगाव, नाशिक, पेण येथील १७ महिलांचे असे एकूण ३१ महिलांचे दर्शन या फोटो प्रदर्शनातून घडवण्यात येणार आहे.
फोटो सर्कल सोसायटीच्या ५४ महिला छायाचित्रकार सदस्या असून त्यापैकी १८ सदस्यांनी या प्रदर्शनासाठी छायाचित्रण केले आहे. महाराष्ट्रातील महिलांमध्ये पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर, प्रसिद्ध लेखिका कवियत्री आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण, कोरीओग्राफर फुलवा खामकर, ठाण्यातील जिद्द शाळेच्या माजी मुख्याध्यापिका, प्रेरणा संस्थेच्या प्रमुख श्यामश्री भोंसले, एडस् बाधित मुले-स्त्रीयांना आधार देणाऱ्या आणि वेश्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या नगरच्या प्राजक्ता कुलकर्णी, नाशिक येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या सुनीता पाटील, महिला स्वयंरोजगारातून स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या पेणच्या अहिल्या महिला मंडळ अशा महिलांचे दर्शन ठाणेकरांना या छायाचित्र प्रदर्शनातून होणार आहे.
शुक्रवार ७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता अरुणाचलच्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री बिन्नी यांगा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ठाणे कलाभवन, बिग बाजार जवळ, कापूरबावडी, ठाणे येथे रविवार ९ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.  
या छायाचित्र प्रदर्शनासाठी स्वप्नाली मठकर, संघमित्रा बेंडखळे, वेदिका भार्गवे, जयदा निकाळे, मेघना शहा, रेखा भिवंडीकर, वेदवती पडवळ, सतेजा राजवाडे, आकृती माहीमकर, गार्गी गिध, नंदिनी बोरकर, मिनल पाटील, असिरा चिरमुले, शिला वागळे, अनघा सांगेलकर, अश्विनी शिर्के, डॉ. चित्रा जोशी, स्नेहा गोरे या महिलांनी छायाचित्रण केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा