रंकाळा तलावाचे प्रदूषण वाढले असून परिणामी तलावातील पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला आहे. त्यामुळे पाण्याचा उग्र वास येत असून शिवसेनेसह विविध संघटनांनी महापालिकेसमोर आंदोलने केल्यानंतर त्याची दखल घेत महापालिकेकडून रंकाळा तलावातील प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली असून रंकाळय़ातील पाणी अधिक गतीने सोडण्यात येत आहे. पाण्यात तयार झालेला हिरवा तवंग उपसा करण्यासाठी चार ते पाच टँकर लावण्यात आले आहेत.
रंकाळा तलावात मोठय़ा प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्याने तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून तर पाण्याला हिरवा रंग येत असून त्याची दरुगधी पसरत आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर त्याची दरुगधी मोठय़ा प्रमाणात पसरलेली असून परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेनेसह विविध संघटनांनी या प्रश्नावरून महापालिकेवर मोर्चे, आंदोलन केली.     
रंकाळा तलावाच्या प्रदूषणामुळे संतप्त जनक्षोभ उसळण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तलावातील पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. रंकाळा टॉवर, मीराबाग व पदपथ उद्यान या तीन ठिकाणांहून प्रत्येकी एक व्हॉल्व्हमधून पाणी सोडले जात आहे. दिवसाला यातून अंदाजे ७० ते ८० लाख लीटर पाणी सोडण्यात येत असल्याचे अभियंता आर. के. पाटील यांनी सांगितले. तलावातील हिरवा तवंग उपसण्यासाठी पाच टँकर लावण्यात आले असून हे पाणी ड्रेनेजमध्ये सोडण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा