माणदेशाच्या इतिहासात नोंदलेल्या १८व्या शतकातील अंतिम दशकात ‘कवटय़ा दुष्काळा’ची आठवण यंदाच्या दुष्काळाने जागवली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, विटा-खानापूर या तालुक्यातील जनता आज पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा धुंडाळत असताना एकच प्रश्न उभा ठाकतो आहे, की स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत पिण्याच्या पाण्याला महाग झालेल्या जनतेचा अपराध तरी काय? ना पिण्याचे पुरेसे पाणी, ना शेतीचा विकास अशा स्थितीत हाताला काम देणारा औद्योगिक विकास तरी कोसो दूरच राहिला. मग जगायचे तरी कसे आणि कोणाच्या भरवशावर?
जत… नेहमीची येतो दुष्काळ
जत तालुका हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. गेली ३० वर्षे म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर येथील राजकारण आणि समाजकारण चालत आलेले. मैलोगणती उजाड माळरान अन् एखादे झाड दिसले तर तेही पानगळीने झडलेले. तालुक्याचे गाव म्हणून जत जिल्ह्याच्या नकाशावर आहे. कन्नड भाषक लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर. पूर्व भागातील उमदी, कोंत्येवबोबलादसारखी गावे कर्नाटकातील विजापूरच्या आदिलशाही राजधानीच्या हाकेच्या टप्प्यात मात्र, पाण्यापासून वंचितच राहिलेले. कर्नाटकात हिरेपडसलगी धरणाच्या पाण्याने सुजलाम् सुफलाम् झाले. मात्र, भौगोलिक सीमेमुळे जत या पाण्यापासून वंचित राहिले.
माडग्याळ, संख, कुंभारी, मुचंडी, बिळूर, उमदी, बसरगी, कुडनूर, अंत्राळ, वाडेकुंडी, बनाळी, िशगणापूर आदी गावे पाण्यासाठी आज टँकरच्या वेळेशी आपली दैनंदिन जीवनपद्धती घडवत आहेत. दळणवळणाच्या सोयीमुळे गाव तिथे एसटी पोहोचली, पण माणसे तिथे पाणी पोहोचले नाही. दळणवळणाच्या साधनामुळे रोजीरोटीसाठी शहरांकडे स्थलांतर झाले. गावातल्या जुन्या संस्कृतीची माणसे, मात्र माझी धरणीमाय म्हणत गावातच राहिली. त्यांची दुसरी पिढी आजही कृष्णेच्या पाण्यासाठी टाहो फोडते आहे.
१९८०च्या दशकात खाऊच्या पानासाठी मुंबईतील लोकमान्य पान बाजारात प्रसिद्ध असलेले बिळूर आज पाण्याअभावी उद्ध्वस्त झाले आहे. पानमळय़ाची शेती एकेकाळी बहरली होती. पानाच्या ताज्या पैशावर खुडकरी, मळेकरी, दलाल उडय़ा मारीत होते. पानमळय़ातील रोजच्या निघणाऱ्या वैरणीवर चाऱ्याची दहा जनावरे दावणीला होती. दुष्काळाने हे चक्रच उद्ध्वस्त केले आहे.
तालुक्यात १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. सलग दोन वर्षांच्या पावसाच्या दडीने ७० हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले. ३५ हजार हेक्टरवरील द्राक्ष आणि ३० हजार हेक्टरवरील डािळब बागा चुलीच्या धन ठरल्या. तालुक्यात २८ तलाव व हजारावर शेततळी आहेत. आभाळमायाच पावली नाही, तर तळी कुठली भरणार? आजच्या घडीला या तालुक्यात केवळ ५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दर तीन-चार वर्षांनी ‘नेहमीच येतो दुष्काळ..’
आटपाडीचा कवटय़ा दुष्काळ
आटपाडी तालुक्यात माणगंगा ही प्रमुख नदी. नदी कसली मोठा ओढाच म्हणावा अशी आजची अवस्था. सिमेंट काँक्रीटच्या जंगलासाठी बेसुमार वाळू उपशाने पाणीसाठवण क्षमताच हरविलेली इ.स. १३९६ ते १४०७ मध्ये पडलेला दर्गादेवीचा दुष्काळ, तर १७९१-९२ मध्ये पडलेला कवटय़ा दुष्काळ.  याच दुष्काळाच्या आठवणी आजच्या घडीला वैराण आणि विराण राने पाहून होते. सातारा जिल्ह्यातील माण-म्हसवड, खटाव, सांगली जिल्ह्यातील खानापूर-विटा, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा या परिसरातील प्रदेशाची ओळख मानदेश म्हणून आहे. हा साराच प्रदेश आज पाण्यासाठी टाहो फोडतो आहे.
आटपाडी तालुक्यातील दिघंची, कवठुळी, सिद्धनाथांची खरसुंडी, शेटफळे, बनपुरी, झरे, करगणी, िनबवडे, हिवतड, माळेवाडी, नेलकरंजी, जांभुळणी आदी गावे दुष्काळाच्या कराल दाढेत सापडले आहेत. पाण्यासाठी येथील लोक टँकरच्या येण्याकडे डोळे लावून दिवस दिवसभर बसून राहतात. हातातोंडाची गाठ पडण्यासाठी रोजगार करायचा, की पाण्यासाठी प्रतीक्षा करीत बसायची, हाच प्रश्न रोजच्या जगण्यातील महत्त्वाचा ठरला आहे. रानात गेले तर काम नाही, गावात आले तर पाणी नाही. जनावरे छावणीच्या छायेत आणि दारातील दावणी मात्र रिकामी. छावणीत मिळणारा चारा दुभत्या जनावराला कितीसा पुरणार? मग भाकड जनावरं सांभाळायची कशासाठी? त्यांच्यासाठी कत्तलखान्याची वाटच सोयीची ठरली.
कवठय़ाला निम्मा तालुका कोरडाच!
म्हैसाळची पाणी देिशग, खरसिंग, बनेवाडी,शिरढोण, बोरगाव-मोरगाव, मळणगाव, कुची, कवठेमहांकाळ, लंगरपेठ आदी गावांना उपयुक्त ठरले. मात्र, घाटमाथ्यावर असणारे वाघोली,घाटनांद्रे, तिसंगी, जाखापूर, कुंडलापूर, रायवाडी, पलीकडच्या तालुक्यातील हिवरे, पळशी, ताडाची वाडी, हा भाग कोरडा ठणठणीत आहे. सह्याद्री रांगाच्या या पट्टय़ात प्रामुख्याने मेंढपाळाचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात आहे. डोंगररांगांत असणाऱ्या गवतावर हा व्यवसाय तग धरून आहे. मात्र, दुष्काळाने मोठय़ा जनावरांसाठी छावण्या झाल्या, शेळय़ा-मेंढय़ांचं काय? असा प्रश्न इथल्या लोकांना आहे. अग्रणी नदी काहीअंशी म्हैसाळच्या पाण्याने वाहती झाली. यामुळे एकाच तालुक्यातील हा भेदभाव म्हणजे एकाच आईची पोरं एक तुपाशी अन् एक उपाशी.
जिल्ह्यातील दुष्काळाने द्राक्ष, डािळब पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. ही स्थिती का निर्माण झाली ? याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर या मातीतला माणूसच बहुअंशी कारणीभूत आहे का? का निष्क्रिय राज्यकर्ते जबाबदार आहेत? याची उत्तरे शोधूनच पुढल्या पिढीचे भवितव्य ठरवावे लागेल.
जळणासाठी अमर्याद वृक्षतोड कारणीभूत आहेच, पण त्याचबरोबर एकर-दीड एकराच्या तुकडय़ाचे बागायतीकरण करण्यासाठी जमिनीत पाण्याकरिता किती फूट खाली जायचे याला धरबंदच राहिलेला नाही. भूगर्भातील पाण्यासाठी शे-सव्वाशे फूट खोल विहिरी खोदण्यात आल्या आहेत. ५०-६० खोल विहिरीत पुन्हा कमी व्यासाची दुसरी विहीर घेण्याचे प्रकारही आटपाडी तालुक्यात दिसून येतात. ट्वेंटी-ट्वेंटी मॅचसारखा ५-६ तासांत पाण्याचा निकाल सांगणाऱ्या कूपनलिका घेतल्या जात असल्यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली आहे. त्याचाही परिणाम सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत आहे.
विजेची उपलब्धता होईपर्यंत सिंचनासाठी विहिरींवर बैलांच्या ताकदीवर मोटेचा वापर होत होता. मोठय़ा शेतकऱ्यांकडे डिझेल इंजिन होते. पण विजेच्या उपलब्धतेने सबमर्सिबलचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला. त्यामुळे जमिनीत पाण्याचा साठाच होणे दुरापास्त झाले. शिमग्यापर्यंत वाहात राहणारे ओढेनाले रब्बीच्या पिकासाठी दिवाळीपर्यंतच कोरडे ठणठणीत पडतात. याचाही विचार कोण करणार?
पाण्यासाठी काय पण…
पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी टँकरची वाट पाहात दिवस दिवसभर बसून राहावे लागते. यामुळे रोजगार बुडतो. यावर उपाय म्हणून दुष्काळग्रस्त भागातील शाळकरी मुलांवर हा भार पालक टाकत आहेत. त्याचा परिणाम शाळेमधील उपस्थितीवर होत असून, ऐन परीक्षेच्या हंगामामध्ये अभ्यासापेक्षा पाण्याच्या प्रतीक्षेला अग्रक्रम मिळाल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस कोण जबाबदार? हाही न उकलणारा प्रश्न आहे.
शासन दरडोई ग्रामीण भागात पाण्याची गरज माणशी ४० लीटर गृहीत धरते. प्रत्यक्षात तेवढे पाणी दिले जातच नाही. आटपाडीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी महिन्यातून फक्त दोन वेळा पाणी पुरवठा होतो. मग मिळणारे पाणी शुद्ध राहणार का? त्या अशुद्ध पाण्याचे आरोग्यावर काय परिणाम होणार? याचाही विचार व्हायला हवा.
शुभकार्य लांबणीवर…
मार्च महिन्यापासून लग्नसराई सुरू होते. दुष्काळी भागात लग्नकार्य म्हटले, की पाण्याची गरज तीव्रतेने जाणवत आहे. अनेक विवाह पाण्याअभावी रखडले आहेत. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे लग्नकार्य लांबणीवर टाकण्याचे प्रकार जत-आटपाडी तालुक्यांत सर्रास आढळून येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reminiscence of kavatya dushkal in sangali