तुमच्या मुलावर भाऊबंदकीतील लोकांनी करणी केल्याने त्याचे आजार वाढत आहेत. बाईच्या अंगात देवी येते, असे सांगून जिल्ह्यातील उडाणे येथे दोन कुटुंबांमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रकार करणाऱ्या दोघांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांसमोर माफीनामा लिहून दिला आहे.
उडाणे येथील गुलाब वेडू पदमर आणि त्यांची पत्नी जन्याबाई हे अंधश्रध्दा पसरवून ग्रामस्थांच्या भावना दुखावतात. त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता मंदा देवरे, गिरीधर वाघ आणि दिलीप वाघ यांनी अंनिसकडे निवेदनाव्दारे व्यक्त केली होती. जन्याबाईच्या अंगात देवी येत असल्याचे भासवून तिच्याकडून देवरे व वाघ कुटूंबियांमध्ये विनाकारण वाद निर्माण करणे सुरू होते. या प्रकरणी संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही फारसा उपयोग झाला नाही. याबाबत धुळे अंनिस शाखेकडे लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आल्यावर त्या तक्रारीचा संदर्भ घेत अंनिसच्या ए. ओ. पाटील, प्रा. दीपक बाविस्कर, शंकर सगरे, नितीन बागूल, अमरदीप पवार, मोहन पवार या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पदमर कुटूंबियांकडून दोघा कुटूंबांना त्रास देणे सुरूच राहिल्याने कार्यकर्त्यांनी तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. चमत्कार आणि त्यातून होणारी बुवाबाजी कशी घडते याविषयी माहिती दिली. संबंधितांचे समाधान झाल्यानंतर गावातील पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत जन्याबाई व ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडून लेखी माफीनामा घेण्यात आला. यापुढे अंगात येणार नाही. कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास कोणाला देणार नाही. आपल्याबद्दल कोणतीही तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे या माफीनाम्यात लिहून देण्यात आले.