शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्याविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारास पक्षनेतृत्वानेही मूकसंमती दिली. या वागणुकीचा जिल्हा ब्राह्मण महासंघाने निषेध केला.
काही दिवसांपूर्वी जोशी यांनी प्रकट मुलाखतीत सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करून प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. जोशी यांच्या टीकेचा उद्रेक दसरा मेळाव्यात झाला. मेळाव्यात जोशी यांच्याविरोधात ‘चले जाव’च्या घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे त्यांना व्यासपीठ सोडावे लागले. या प्रकाराचा जिल्ह्यात ब्राह्मण महासंघाने निषेध नोंदविला. जोशी यांनी आपली सर्व हयात खर्ची करून शिवसेना उभारली. त्यांचा या पद्धतीने पक्षनेतृत्वाने अपमान करणे ही बाब दुर्दैवी असून, तिचा तीव्र निषेध करीत असल्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष विकास शेटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. ब्राह्मण समाज कायम शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहात आला आहे. ब्राह्मण समाजाच्या नेत्यांना शिवसेना अपमानास्पद वागणूक देत असेल, तर त्याचे गंभीर परिणाम पक्षास भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला.

Story img Loader