औरंगाबाद शहरवगळता फारसे उद्योगधंदे वाढले नाहीत. साखर कारखाने बंद आहेत. सहकारी संस्था मोडीत निघाल्या. मोसंबी व आंब्याचे क्षेत्र धोक्याच्या पलीकडे गेले आहे. शेतकऱ्यांची अवस्था पराकोटीची बिघडली आहे. वारंवार येणाऱ्या अवर्षणाने पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. फळबागा पाण्याविना तोडाव्या लागत आहेत. गावातील काही कुटुंबांची दृश्य आर्थिक स्थिती सुधारली आहे. राजकारण व व्यसनांच्या विळख्याने तरुण पिढी वाया चालली आहे. गावातील वयस्क माणसे हतबल होऊन फटफटय़ा उडविणाऱ्या नि हाताबाहेर चाललेल्या पोरांकडे हताश होऊन पाहत आहेत. हे सारे वास्तव मराठवाडय़ाच्या कथा-कादंबऱ्या आणि कवितेतून यायला हवे, असे मत मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी व्यक्त केले.
पैठण येथे ३४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना भांड बोलत होते. मराठवाडय़ातील लेखक व त्यांच्या लेखनविषयांच्या अनुषंगाने त्यांच्या लिखित भाषणातील काही मुद्दे उपस्थितांना अंतर्मुख करून गेले. भाषणात दोन लढय़ांचे संदर्भ सुस्पष्टपणे मांडले गेले आहेत. मराठवाडय़ाची अस्मिता नि येथील प्रश्न साहित्यात यावेत, असे सांगताना भांड म्हणाले की, निजामी राजवटीविरुद्ध मराठवाडय़ाच्या जनतेने दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा दिला. सामान्य माणसे हैदराबाद मुक्तिसंग्रामात पेटून उठली. मुक्तिसंग्रामाचा इतिहास चरित्र, आत्मचरित्रातून दिसतो. मात्र, कादंबरीसारख्या सर्जनशील वाङ्मय प्रकारात एखादी लक्षणीय कलाकृती नजरेत भरत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
निजामाच्या लढय़ासारखाच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे म्हणून उभारलेला लढाही तेवढाच मोठा होता. या दोन्ही लढय़ांवरही सशक्त कादंबरी लिहिण्याचे सर्जनशील आव्हान मराठवाडय़ातील नव्या-जुन्या ताकदीचे लेखक पेलू शकले नाहीत, असेही बाबा भांड म्हणाले. अध्यक्षीय भाषणाच्या वेळी काही वेळ वीज गेली, पण त्यांनी भाषणात खंड पडू दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू, दादाभाई नौरोजी, महर्षी शिंदे, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, पं. मालवीय, महात्मा गांधी, योगी अरविंद, मादाम कामा, लाला लजपतराय, बालगंधर्व, राजा रविवर्मा अशा अनेक गुणवंतांना युगद्रष्टा सयाजीराव गायकवाड यांनी कोटय़वधींची मदत केली. पण त्यांचे स्मरण महाराष्ट्रात होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बांधकाममंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार विक्रम काळे, आमदार संजय वाघचौरे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, डॉ. दादा गोरे, कुंडलिकराव अतकरे, देविदास कुलकर्णी, प्राचार्य संतोष तांबे, डॉ. राघवेंद्र चाकूरकर, कल्याण बरकसे, नगराध्यक्ष राजू गायकवाड, रवींद्र शिसोदे यांची उपस्थिती होती.
साहित्य संमेलनातही समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा
बाबा भांड यांनी समन्यायी पाणी वितरणाच्या मुद्दय़ावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवरायांनी सामीलकीचे राजधोरण स्वीकारले. पाणी ही संपत्ती आहे, हे ओळखले. गड, किल्ले, रयतेसाठी जलस्रोत राखणे, सगळ्यांसाठी तो साठा जपून वापरणे याची काळजी घेतली. हे सामंजस्य आज कोठे दिसत नाही. सगळा महाराष्ट्र, मराठी माणसे एक आहेत. सगळी भावंडे आहेत. ऐश्वर्यात नि संकटात एकमेकांना बरोबर घ्यायला हवे, ही शिवरायांची विशाल दृष्टी. आजूबाजूला काय दिसतेय? एक भाग दुष्काळाने घेरलेला. माणसांना व जनावरांना प्यायला पाणी नाही. शेतीवाडी नि कारखाने नंतरचा भाग. पण जिथे थोडे जास्त पाणी. त्यांनी अतिरिक्त पाणी शेजाऱ्यांना देणे हा मानवीय धर्माचा मूळ संदेश. पण असहिष्णूपणाची लागण राजकारण नि समाजकारणात पराकोटीला पोहोचली. माणसे सत्ता, राजकारण आणि स्वत:चे अस्तित्व आपापल्या क्षेत्रात टिकविण्यासाठी अमानवीय संघर्षांचे बळी पडत आहेत. त्याबद्दल येथील साहित्यिकांची भूमिका आहे की नाही, हे वास्तव सर्जनाच्या पातळीवर मांडण्याचे आवाहन लेखकाने स्वीकारायला हवे.
क्षणचित्रे
* सकाळी बाहेरील नाथ मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या कलाकारांमुळे ग्रंथिदडी वैशिष्टय़पूर्ण ठरली.
* संमेलनस्थळी ५० पेक्षा अधिक पुस्तकांची दालने उभारली होती.
* गोदांगण या स्मृती विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन.