‘दुष्काळात आम्हाला लाचारीचे जगणे नको’, असे म्हणत खानापूरचे ग्रामस्थ आपल्या भागातील नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरसावले आहेत. ग्रामस्थांच्या या निर्धारामुळे सांगली जिल्ह्य़ातील खानापूर, तासगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यांतून वाहणारी आणि सध्या मृत असलेली अग्रणी नदी आता पुन्हा वाहती होणार आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या कामास सुरुवात होत असून ‘जलबिरादरी’ ही संस्था यासाठी सहकार्य करीत आहे. जलबिरादरीचे प्रदेश संघटक सुनील जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भानुदास सूर्यवंशी, दीपक पवार, संपतराव पवार, नरेंद्र चूघ या वेळी उपस्थित होते.
अग्रणी ही कृष्णेची उपनदी आहे. ही नदी सांगलीतील बेणापूर गावच्या पठारावर उगम पावून खानापूर, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यांतून वाहत जाते आणि बेळगावमधील अथणी येथे कृष्णेला मिळते. ही नदी सध्या मृत आहे. या भागात नदीव्यतिरिक्त पाण्याचा इतर कोणताच शाश्वत स्रोत नाही. त्यामुळे पाण्याच्या टंचाईने त्रासलेले ग्रामस्थ नदी वाहती करण्यासाठी पुढे झाले आहेत. नदीच्या खोलीकरणासाठी जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर व ट्रॉली अशा यंत्रसामग्रीची गरज भासणार आहे. यंत्रसामग्रीचा प्रतितास सहाशे रुपये खर्च गृहीत धरून तो भागविण्यासाठी ‘एक कुटुंब एक तास’ या तत्त्वावर निधी गोळा केला जाणार आहे.
या पुनरुज्जीवनाच्या कामात नदीची स्वच्छता, खोलीकरण, पाणी व्यवस्थापन प्रक्रियांचे सीमांकन या बाबींचा समावेश असणार आहे. तसेच पुण्यातील ‘सृष्टी एन्व्हायर्नमेंट अँड सस्टेनॅबिलिटी सोसायटी’ च्या सहकार्याने अग्रणी नदीच्या परिक्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी नदीपात्रात लहान सिमेंटचे बंधारे बांधणे, नदीतील कठीण खडकांचा संरक्षण भिंत म्हणून वापर करणे, भूमिगत बंधारे बांधणे आणि बांबू व दाट वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करणे अशी कामेही हाती घेतली जाणार आहेत.
११ एप्रिलला नदीच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. २५ ते २८ एप्रिल दरम्यान जलबिरादरीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सिंह ग्रामस्थांशी चर्चा करणार असून त्यातून कामाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
सांगली जिल्ह्य़ातील खानापूरचे ग्रामस्थ करणार अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन
‘दुष्काळात आम्हाला लाचारीचे जगणे नको’, असे म्हणत खानापूरचे ग्रामस्थ आपल्या भागातील नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरसावले आहेत. ग्रामस्थांच्या या निर्धारामुळे सांगली जिल्ह्य़ातील खानापूर, तासगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यांतून वाहणारी आणि सध्या मृत असलेली अग्रणी नदी आता पुन्हा वाहती होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहू
First published on: 04-04-2013 at 01:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renewal of agrani river by villager of khanapur in sangli