स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले यांना नियमबाह्य़ मुदतवाढ देण्याचा घाट संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी घातला. या बाबत तक्रारी झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
१९५०च्या सुमारास स्वामी रामानंद तीर्थ यांनी पीपल्स महाविद्यालय स्थापन केले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यानंतर स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी काही काळ संस्थेचा कारभार समर्थपणे, आदर्श पद्धतीने सांभाळला. त्यानंतर मात्र महाविद्यालयाच्या कारभाराबाबत जाहीर तक्रारी होऊ लागल्या. नुकत्याच झालेल्या सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले असताना आता भरती प्रक्रियेत वादग्रस्त ठरलेले प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले यांना नियमबाह्य़ मुदतवाढ देण्याचा विडा काही पदाधिकाऱ्यांनी उचलला आहे.
प्राचार्य डॉ. इंगोले येत्या ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार महाविद्यालयात डॉ. अशोक सिद्धेवाड, प्रा. भिलवंडे, डॉ. श्रीनिवास पांडे व रमा नवले यांच्यासारखे वरिष्ठ प्राध्यापक प्राचार्य पदासाठी पात्र ठरत आहेत. असे असताना संस्थेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी डॉ. इंगोले यांनाच मुदतवाढ देण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. मुदतवाढ देण्यासाठी आवश्यक व बंधनकारक असलेल्या सर्व नियमाना तिलांजली देत संस्थेने मुदवाढीचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाकडे पाठवला. वास्तविक, सेवानिवृत्तीला ३ महिने शिल्लक असताना मुदतवाढीचा प्रस्ताव उच्चशिक्षण संचालकांमार्फत सरकारला सादर करणे बंधनकारक आहे. शिवाय ही मुदतवाढ देण्यापूर्वी हे रिक्त पद भरण्यासाठी किमान दोन वेळा वृत्तपत्रात जाहिरात देणे बंधनकारक आहे. पण अशा सर्व बाबींकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.

Story img Loader