दररोज बाराशेपेक्षा अधिक प्रवाशांची ने-आण करणाऱ्या उरणच्या मोरा ते मुंबईदरम्यानच्या जलप्रवाशांना अनेक  समस्यांना सामोरे जावे लागत असून येथील दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशाकडून केली जात होती. त्यानुसार महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दुरुस्तीचे काम काढण्यात आलेले असल्याची माहिती मोरा येथील महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे.
उरण शहर मुंबईदरम्यानच्या अरबी समुद्रातून जलमार्गाने प्रवास करण्यासाठी अवघा अर्धा ते पाऊण तास लागतो. सध्याच्या वाहतूक कोंडी तसेच प्रदूषणयुक्त प्रवासापेक्षा किती तरी आरामदायक प्रवास म्हणून मोरा ते मुंबईदरम्यानच्या जलप्रवासाकडे पाहिले जाते. या प्रवासाकरिता प्रवाशांना एका वेळचे ३५ रुपये मोजावे लागतात, तर याच प्रवासासाठी पावसाळ्यात मात्र नेहमीच्या तिकीट दरापेक्षा दहा रुपये अधिक मोजावे लागतात. या प्रवासासाठी प्रवाशांकडून जेटीवर सुविधा पुरविण्यासाठी कराची आकारणी केली जाते. या करामधून मेरिटाइम बोर्डाने प्रवाशांना सुविधा पुरवायच्या असतात. सरासरी एक तासाने येणाऱ्या लाँचमुळे प्रवाशांना जेटीवर तासाभरापेक्षा अधिक काळ थांबावे लागते. अशा वेळी स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृहात पाण्याचीही सोय नसल्याने दरुगधी आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांची वाहने उभी करण्यासाठीही जागा कमी पडत आहे. अशा अनेक समस्या असून जेटीवरील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा काढण्यात आलेली असून लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती मोरा येथील मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी एन.एस. कोळी यांनी दिली आहे.

Story img Loader