अभिनेत्री म्हणून रेणुका शहाणेचे ‘हम आपके है कौन’, ‘अबोली’ हे हिंदी-मराठी चित्रपट चटकन आठवतात. परंतु, ‘सुरभि’ या मालिकेच्या सूत्रसंचालनाद्वारे दूरदर्शनच्या माध्यमातून देशभरांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात रेणुका शहाणेने मिळविलेले यश कायमच लक्षात राहणारे आहे. टीव्ही माध्यमातून हिंदी मालिकांद्वारे रेणुका शहाणे घरोघर पोहोचली. त्यानंतर ती झळकली ते मराठी चित्रपटाची दिग्दर्शक म्हणून. स्त्री-पुरुष नातेसंबंधांभोवती गुंफलेल्या ‘रिटा’चे दिग्दर्शन करताना तिने पल्लवी जोशी आणि जॅकी श्रॉफची प्रमुख भूमिकांसाठी निवड केली होती. पदार्पणातच दिग्दर्शक म्हणून केलेल्या चित्रपटाची दखल सर्वानी घेतली होती. आता मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर ती हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.
यासंदर्भात बोलताना रेणुका शहाणे म्हणाली की, हिंदी सिनेमा दिग्दर्शित करायचे ठरविले आहे एवढेच खरे तर या घडीला सांगू शकते. लेखक गिरीश जोशी या सिनेमाची पटकथा लिहिण्याचे काम करीत असून पिता-कन्या यांच्या नात्याबद्दलच्या या सिनेमात परेश रावल पित्याच्या भूमिकेत दिसणार आहेत इतकेच आतापर्यंत निश्चित झाले आहे.
गिरीश जोशी यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये सादर झालेल्या एकांकिकेत सचिन खेडेकरसोबत आपण काम केले होते. तर परेशभाईंनीही गिरीश जोशी लिखित ‘काटकोन त्रिकोण’ नाटकाच्या गुजराती आवृत्तीत काम केले आहे. त्यामुळेच निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांनी चित्रपटाची थोडक्यात संकल्पना सांगितल्यानंतर त्यावर आधारित पटकथा लिहिण्यासाठी गिरीश जोशी यांना विचारणा केली. अजून साधारण एक-दीड महिन्यानंतर पटकथालेखन पूर्ण झाले की चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम सुरू करण्याची शक्यता रेणुकाने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. पिता-कन्या यांच्या नात्यांवरील या चित्रपटात तूच दिग्दर्शक असल्यामुळे स्वत:च कन्येची व्यक्तिरेखा साकारणार का या प्रश्नावर नक्कीच नाही असे उत्तर रेणुकाने दिले. दिग्दर्शक म्हणून चित्रपट करताना मीच भूमिका साकारणे हे मला पटत नाही. किंबहुना दिग्दर्शक म्हणून काम करताना एकाग्रतेने चित्रपट करता यावा म्हणून दिग्दर्शन करताना भूमिका साकारायची नाही हे जाणीवपूर्वक ठरविले आहे, असे रेणुकाने नमूद केले. सध्याच्या स्पर्धात्मक जगात पिता-कन्या यांच्या नात्याचे अनेक पदर या चित्रपटात पाहायला मिळू शकतील. परंतु, अद्याप पटकथा आणि अन्यही अनेक गोष्टी पूर्णत्वास यायच्या असून हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करतेय यापलीकडे काहीच सांगता येणार नाही, असेही तिने स्पष्ट केले.