पूर्व नागपुरात जी काही देवीचे शक्तीपीठे आहेत त्यात सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू येथील गांधी पुतळ्याजवळ असलेले भोसलेकालीन रेणुका देवीचे मंदिर अत्यंत महत्त्वाचे आहे. रेणुका देवीच्या  मंदिराला सातशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास असून या मंदिराकडे जागृत स्थान म्हणून बघितले जाते.
मंदिराच्या इतिहासाबद्दल अनिल येरणे म्हणाले, ज्या ठिकाणी मंदिर आहे तो भाग पूर्वी गरुड खांब परिसर म्हणून ओळखला जायचा आहे. आजही मंदिराच्या मागच्या बाजूला गरुड खांब आहे. गरुडाजवळ मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराची जबाबदारी त्यावेळी नागा गोसावी लोकांकडे होती. माहुरप्रमाणे या मंदिराच्या परिसरात आजही अनेक नागा गोसावीच्या समाधी होत्या मात्र, कालातरांने त्या नेस्तानाबूत झाल्या आहेत. रेणुका मातेची मूर्ती स्वयंभू आहे. १९२७ मध्ये परिसरातील लोकांनी साधे टिनाचे शेड बांधून मंदिर तयार केले होते. या मंदिराची जबाबदारी त्यावेळी कृष्णराव वडय़ाळकर व अध्यक्ष दादा बिंड यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यावेळी टिनाचे शेड काढून त्या ठिकाणी छोटेसे मंदिर बांधले. त्यावेळी नागपूर हे मध्यप्रदेशमध्ये अंतर्भूत असताना त्याचवेळी ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या तीस वर्षांत मंदिरातील आतील गाभाऱ्याचा दोनदा जीर्णोद्धार करण्यात आला. १९५३ मध्ये ट्रस्ट स्थापन करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष धुंडीराज पाठक यांनी त्यांच्या कार्यकाळात मंदिराच्या जीर्णोद्धराचे काम सुरू केले. रेणुका मातेचे भव्य असे मंदिर तयार करण्यात आले. तेव्हापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली. जवळपास १५ वर्ष पूर्व मुखी प्रवेश द्वार होते मात्र, त्यानंतर उत्तरमुखी प्रवेशद्वार करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी अखंड ज्योतीसाठी मंदिराच्या वरच्या भागात प्रशस्त सभभागृह बांधण्यात आले आहे. या मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने आजबूजाचा परिसर सुशोभति करण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. चैत्र आणि अश्विन महिन्यात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत असतात.  नवरात्र उत्सवात दररोज भजन, कीर्तन, जोगवा आदी कार्यक्रम होत असतात. सकाळी ५.३० वाजेपासून दर्शनार्थीची गर्दी सुरू होते ते रात्री ११ पर्यंत दर्शनार्थी मंदिरात येत असतात. धार्मिक कार्यक्रमासोबतच मंदिर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. चैत्र नवरात्र उत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन नवरात्रानंतर धान्य वाटप केले जाते. शिवाय येणाऱ्या काळात मंदिर परिसरात धमार्थ दवाखाना सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले.