आगामी कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना या अनुषंगाने प्रस्तावित अनेक कामे अद्याप रखडलेली आहेत. निधी उशिरा प्राप्त झाल्याने काही कामे नुकतीच सुरू झाली तर काही कामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने पुन्हा नव्याने हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागाने सिंहस्थासाठी जिल्ह्यातील प्राचीन मंदिराच्या डागडुजीचे काम सुचविले होते. विभागाला उशिराने निधी प्राप्त झाला असून यामुळे अनेक कामांची भिस्त ही पावसाच्या आगमनावर अवलंबून आहे. पावसाचे लवकर आगमन झाल्यास जूनअखेर कामे पूर्ण होतील की नाही, याबद्दल साशंकता आहे.
सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याची उलट गिनती सुरू झाली असून प्रशासकीय पातळीवर कामकाजाला वेग देण्यात आला आहे. कुंभपर्वात लाखो भाविक त्र्यंबक-नाशिक गोदाकाठावर शाहीस्नान तसेच पर्वणी निमित्त दाखल होणार आहेत. गोदाकाठावरील प्राचीन मंदिरात दर्शनासाठी त्यांची रीघ लागणार आहे. ही बाब लक्षात घेता पुरातत्त्व विभागाने प्राचीन मंदिराची डागडुजी तसेच रासायनिक जतन प्रक्रिया करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. राज्य शिखर समितीने उशिराने हा प्रस्ताव मान्य करत अंतिम टप्प्यात पुरातत्त्व विभागाला एक कोटी ३१ लाख ४४ हजार ७५६ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
हा संपुर्ण निधी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करत एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली. या कामामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील काही मंदिरांना नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. त्यात नाशिकच्या गोदाकाठावरील सुंदर नारायण मंदिर, निळकंठेश्वर मंदिरासह त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ कुंड, इंद्राणेश्वर, त्रिभुवणेश्वर आणि बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश आहे. यातील काही मंदिरे अतिप्राचीन असल्याने त्यांच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. या सर्व मंदिराचे काम दगडी बांधकामात असल्याने पर्यावरणीय बदलामुळे बऱ्याच ठिकाणी दगडाची झीज झाली. काही ठिकाणी मंदिरावर वड, पिंपळ किंवा अन्य काही वृक्षांनी पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर, पुरातत्त्व विभागाने रासायनिक जतन प्रक्रियेंतर्गत अनेक कामे केली. त्यात मंदिराच्या बाहेरील तसेच गाभाऱ्यात आलेली छोटी मोठी झुडपे काढुन घेतली. मुळामुळे तयार झालेले छिद्र बुजविले, पावसाळ्यात गाभाऱ्यात होणारी गळती थांबविणे आदी कामे करण्यात आली आहेत. सध्या त्र्यंबक येथील काम अंतिम टप्प्यात असून १५-२० मे अखेर ते पूर्ण होईल असा अंदाज आहे.
दुसऱ्या टप्प्यात नाशिक येथील मंदिरात काम सुरू होणार आहे. मात्र यंदा मान्सुनचे वेळेवर आगमन होणार असल्याचा अंदाज आहे. ही कामे जूनमध्ये सुरू झाल्यास आणि त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली तर ही सर्व कामे रखडणार आहेत. जूनमध्ये पाऊस झाला नाही तरच जूनअखेरीस दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण होऊ शकतील. यामुळे पुरातत्त्व विभागाची कामे होण्याची भिस्त पावसाच्या आगमनावर अवलंबून आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा