दहावीची परीक्षा खासगीरित्या दिलेल्या आणि गेल्या वर्षी दहावीला अनुत्तीर्ण झालेल्या मुंबईतील पुनर्परीक्षार्थीचा निकालही यंदा चांगला लागला आहे. या विद्यार्थ्यांचा केवळ उत्तीर्णतेचा टक्काच नव्हे तर प्रथम आणि विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्याही यंदा लक्षणीय आहे. त्यामुळे, काही महाविद्यालयांमध्ये नियमित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांशीही स्पर्धा करावी लागण्याची शक्यता आहे.
यंदा मुंबईतून अशा एकूण ३,८०,५८८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ५४,३१३ इतके विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. यापैकी ४५.४८ टक्के म्हणजे २४,६९९ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी हीच आकडेवारी अनुक्रमे अवघी २३.५७ टक्के आणि ७,९०३ इतकी होती. त्या आधीच्या वर्षी म्हणजे २०१३ मध्येही तो ३४.५५ टक्के इतकाच होता.
बारावीप्रमाणे सर्वच विषयांना लागू केलेले शाळास्तरावरील अंतर्गत मूल्यमापन, लेखी परीक्षेतील दिघरेत्तरी प्रश्नांची कमी झालेली संख्या आणि लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या एकत्रित गुणांआधारे उत्तीर्ण करण्याची पध्दती यामुळे दहावीचा एकूणच निकाल यंदा चांगलाच उंचावला आहे. निकालाचे हेच प्रतिबिंब पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालातही उमटले आहे. कारण, या विद्यार्थ्यांचेही शाळास्तरावर मूल्यमापन केले जाते. त्यासाठी या विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’मार्फत शाळा नेमून दिली जाते. या मूल्यमापन पध्दतीचा फायदा याही मुलांना झालेला दिसून येतो.
यंदा तर मुंबईत ७५ टक्क्य़ांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय म्हणावी इतपत वाढली आहे. गेल्या वर्षी मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे, ठाणे, रायगड मिळून केवळ चार विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य श्रेणी मिळाली होती. मात्र, यंदा ही श्रेणी मिळविणारे २५४ विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे गेल्या वर्षी अवघे २४ होते. यंदा हा आकडा २१५२ वर गेला आहे. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यंदा ८४६५ आहेत. तर गेल्या वर्षी ही संख्या अवघी १७५ होती.
मुंबईत खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा आकडा फुगतो. हे विद्यार्थी जितके वाढतात तितका निकाल कमी कमी होत जातो. परंतु, यंदा या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचा निकाल वाढला आहे, अशी प्रतिक्रिया राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा