कर्जत तालुक्यातील कुकडी डावा कालव्याच्या मुख्य वितरिकेवरील ७५, ७६, ७७ व ७८ क्रमांकाच्या चारीचे गेट अनाधिकाराने बंद करून त्याचे नुकसान करणा-या कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिका-यांवर गुन्हा नोंदवावा अशी लेखी तक्रार भाजपचे कैलास शेवाळे यांनी पोलिसांकडे केली आहे.
या तक्रारअर्जामध्ये म्हटले आहे, की २० फेब्रुवारी रोजी तालुक्यातील कुकडी डावा कालवा वितरिकांचे गेट महामंडळाचे उपअभियंता एन. ए. पठाण, शाखा अभियंता आर. एस. जगताप व लगड यांनी अनाधिकाराने बंद केले आहेत. त्या बंद करताना त्यांनी कालव्याचाच भराव खोदला. याशिवाय पाणी सोडण्याचे गेट बंद करण्यासाठी त्यामध्ये दगड, मुरूम व काटेरी झुडपांचा वापर केला. नंतर त्यांनी जेसीबी लावून कालव्याच्या लायनिंगचा स्लॅब तोडला. हे करताना या अधिका-यांनी ज्या शेतक-यांनी श्रमदान करून स्वखर्चाने या कालव्यावर चार गेट बसवले ते बंद केले व पाणीपट्टी भरलेली असताना शेतक-यांना मात्र पाणी दिले नाही.
अशाप्रकारे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणा-या अधिका-यांवर कायदेशीर गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी कालव्यांची दुरवस्था झाली असून अनेक वितरिकांचे काम अधिका-यांनी कागदोपत्री केल्याचे दाखवले आहे. त्यामुळे सर्वच वितरिकांची दुरवस्था झाल्याची त्यांनी तक्रार केली आहे.
कृष्णा खो-याच्या अधिका-यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार
कर्जत तालुक्यातील कुकडी डावा कालव्याच्या मुख्य वितरिकेवरील ७५, ७६, ७७ व ७८ क्रमांकाच्या चारीचे गेट अनाधिकाराने बंद करून त्याचे नुकसान करणा-या कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिका-यांवर गुन्हा नोंदवावा अशी लेखी तक्रार भाजपचे कैलास शेवाळे यांनी पोलिसांकडे केली आहे.
First published on: 25-02-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report against krishna valley officers in police