हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा नदी व पाणी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या घटकांची तपासणी करण्यासाठी चार पथके रवाना झाली आहेत. या पथकांचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
गतवर्षी उन्हाळ्यामध्ये इचलकरंजी परिसरात काविळीचा फैलाव झाल्याने ३० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पंधरवडय़ापूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच पंचगंगा नदीकाठच्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी उपसा न करण्याचे आदेश दिले होते.
त्याची दखल घेऊन प्रांत ठोंबरे यांनी हातकणंगले तालुक्यातील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेस अँड प्रोसेस सायझिंग, कत्तलखाना, वाहन सव्‍‌र्हिसिंग सेंटर आदी उद्योग व्यवसायाची तपासणी करण्यासाठी चार पथके तयार केली आहेत. त्यामध्ये मंडल अधिकारी, तलाठी व इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या निरीक्षकांचा समावेश आहे. एका पथकामध्ये ५ व्यक्तींचा समावेश आहे.
उपरोक्त उद्योगांना भेटी देऊन पथकातील अधिकारी उद्योग परवाना, प्रदूषण नियंत्रण परवाना,सांडपाण्याची निर्गत यांची पाहणी करणारे आहेत. सायझिंग प्रकल्पाचे सांडपाणी सीईटीपी प्रकल्पाला जोडले आहे का याची तपासणी केली जाणार आहे.
इचलकरंजी शहर व परिसरात आठ ते दहा प्रोसेस विना परवाना सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.अनेकदा सूचना करूनही कांही प्रोसेसनी सीईटीपीला सांडपाणी जोडलेले नाही, अशा उद्योगांवर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांत ठोंबरे यांनी सांगितले.

Story img Loader