जिल्ह्याच्या विकासाला कारणपरत्वे अडथळा ठरणाऱ्या विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या सदोष कार्यपद्धतीचा जनतेच्या दरबारात लेखाजोखा अहवाल मांडण्याचा निर्णय धुळे जिल्हा विकास तज्ज्ञ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
समितीचे मुख्य प्रवर्तक हिरालाल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समितीचे संपर्कप्रमुख महेश घुगे यांनी समितीने दोन वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. जिल्ह्याच्या सर्वागीण विकासार्थ प्राप्त परिस्थिती, उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे काय करता येणे शक्य आहे, याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाला व संबंधित विभागाच्या प्रमुखांना वर्षांपूर्वीच सादर करूनही संबंधितांनी त्या संदर्भात दाखविलेल्या उदासिनतेबद्दल उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा प्रशासन विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी उदासीन असले तरी समितीने नाउमेद न होता जिल्ह्याच्या विकासासाठी आपला पाठपुरावा सुरूच ठेवावा, असे आवाहन हिरालाल ओसवाल यांनी केले. ओसवाल यांच्या या आवाहनास सर्वच सदस्यांनी प्रतिसाद दिला. विकासकामांबद्दल माहितीच्या अधिकारात जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन वस्तुस्थिती जनता दरबारात मांडण्याचा एकमुखी निर्णयही घेण्यात आला.
समितीची नोंदणी करणे, जिल्ह्यातील नवोदित उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी व राज्यातील आणि देशातील उद्योजकांना जिल्ह्यात उद्योग उभारण्याचे आवाहन करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबीर घेणे, जिल्हा प्रशासनाला सर्वागीण विकासाच्या पिछेहाटीची जाणीव करून देणे, शहर विकास आराखडय़ात हेतूत: होत असलेल्या अप्रत्यक्ष हस्तक्षेपाची माहिती घेणे व प्रस्तावित उद्योगांची माहिती घेऊन ती जनतेपर्यंत पोहचविण्याचे निर्णयही यावेळी घेण्यात आले. बैठकीला ओसवाल, घुगे यांच्या सोबत लखन भतवाल, प्रा. मु. ब. शाह, वसंत ठाकरे, विजय जमादार, प्रभाकर पाटोळे, डॉ. नंदकुमार द्रविड, रमेश संघवी, डॉ. संजय खोपडे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा