जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पडला असून काही किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा निवडणूक यंत्रणेने केला. मतमोजणीनंतर यंत्र रवाना होत असताना यंत्रात काही फेरफार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. याबाबत तक्रारदारांच्या शंकांचे निरसन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. निवडणुक प्रक्रियेतील गैरसोयी तसेच त्रुटी, अन्य काही कामांबाबत वरीष्ठ पातळीवर तसेच मुख्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली आहे. या कामासाठी २६ ते २७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेचे सहकार्य मिळाले. मतदानाच्या दिवशी पोलीस कर्मचारी दशरथ जाधव यांचा कामावर असतांना हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेव्यतिरिक्त कोणताही प्रकार या कालावधीत घडलेला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. या संदर्भात जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून १० लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. मतदार यादीत गोंधळ असल्याच्या तक्रारींचे प्रमाण नगण्य होते. मतदानाच्या दिवशी बीएलओची गैरव्यवस्था होऊ नये यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली. मात्र काही ठिकाणी मदत पोहचु शकली नाही. या पाश्र्वभूमीवर, मतदार याद्यांप्रमाणे मतदार चिठ्ठी तसेच अन्य कामे करण्यासाठी कायमस्वरूपी बीएलओंची व्यवस्था करण्यात यावी, निवडणूकीशी संबंधित महत्वाचे तसेच अन्य दस्ताऐवज ठेवण्यासाठी एक कार्यालय असावे, निवडणुकीसंदर्भात कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारचे भत्ते वेळेत देता यावे यासाठी वेळेत निधी उपलब्ध व्हावा आदी प्रश्नांबाबत वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
आचारसंहिता काळात काही पेडन्यूज प्रकरणी तीन उमेदवारांवर निरीक्षकांनी स्वतहून काही तक्रारी नोंदविल्या आहेत. त्या संदर्भात संबंधित उमेदवारांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. मतदानानंतर सिलबंद मतपेटय़ा रवाना होत असतांना यंत्रात काही फेरफार झाल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात आल्या. याबाबत उमेदवारांच्या शंकेचे निरसन करण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील नैताळे वगळता संपुर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे पाटील यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा