चंदगड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ऐनवेळी ग्रामसभा रद्द करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आल्याचे चित्र प्रजासत्ताकदिनी ग्रामीण भागात पाहावयास मिळाले. ग्रामसभा होणार या अपेक्षेने गावोगावी जमलेल्या ग्रामस्थांचा हिरमोड झाला. दरम्यान प्रजासत्ताकदिनाचा ६३ वा वर्धापनदिन कोल्हापुरात उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन या दोन्ही दिवशी ग्रामसभांचे आयोजन करण्याचे शासन आदेश आहेत. त्यानुसार बहुतांशी ग्रामपंचायतींना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्रामसभा होणार असल्याची दवंडी गावोगावी पिटण्यात आली होती. तथापि जिल्ह्य़ात चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. धावपळ करून ग्रामसभा रद्द करण्यासाठी रातोरात प्रयत्न सुरू झाले. दिलेल्या नोटिसा रद्द व्हाव्यात, यासाठी प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. ग्रामपंचायतींसमोर ध्वजारोहण झाल्यानंतर नागरिक ग्रामसभेसाठी एकत्रित झाले. त्यांना आचारसंहितेमुळे ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले नसल्याचे सांगितले. ऐनवेळी ही माहिती दिल्याने ग्रामस्थांत व ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांत वादाचे प्रसंग उद्भवले.
शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्यांनी मानवंदना स्वीकारून संचलनाची पाहणी केली. पोलीस सशस्त्र दल, एन. सी. सी. पथक, पोलीस बँड, श्वानपथक, गृहरक्षक दल, बिनतारी संदेश विभाग, महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, वनरक्षक दल आदी पथकांनी शानदार संचलन केले. कोल्हापुरातील कलाकृती, लोकसंस्कृती यावर आधारित चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. पोलीस उपनिरीक्षक संजय चौगुले यांना जाहीर झालेला मरणोत्तर शौर्य पुरस्कार त्यांच्या पत्नी विजया चौगुले यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. कारागृह अधीक्षक प्रदीप जगताप यांना राष्ट्रपतिपदकाने सन्मानित करण्यात आले. समीर काळे, महादेव पाटील (यशस्वी उद्योजक), मुबारक शेख, संभाजी कोपार्डेकर यांना (उत्कृष्ट लघुउद्योजक), जय क्रीडा कला सांस्कृतिक मंडळास नेहरू जिल्हा युवा केंद्राचा (युवा मंडळ पुरस्कार), उज्वला नागेशकर, ललीता कुंभार, निलोफर मुजावर यांना (व्हाईट आर्मी) पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. दरम्यान महापालिकेच्या वतीनेही प्रजासत्ताकदिनी महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर जयश्री सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपआयुक्त संजय हेरवाडे, अश्विनी वाघमळे, नाशिक विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत खरटमल, उपमहपौर सचिन खेडकर, स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
कोल्हापुरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ऐनवेळी ग्रामसभा रद्द करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आल्याचे चित्र प्रजासत्ताकदिनी ग्रामीण भागात पाहावयास मिळाले. ग्रामसभा होणार या अपेक्षेने गावोगावी जमलेल्या ग्रामस्थांचा हिरमोड झाला. दरम्यान प्रजासत्ताकदिनाचा ६३ वा वर्धापनदिन कोल्हापुरात उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आले.
First published on: 27-01-2013 at 08:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day celebrated enthusiastically in kolhapur