लातूर जिल्हय़ाचा विकासाचा वेग तुलनेने अधिक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
प्रजासत्ताकदिनी क्रीडासंकुलाच्या मदानावर आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. खासदार जयवंत आवळे, आमदार अमित देशमुख, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे या वेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, की २०१४-१५च्या जिल्हा वार्षकि योजनेसाठी २२८ कोटी ३३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखडय़ास राज्य मंत्रिमंडळाच्या बठकीत मंजुरी मिळाली. लातूर व उदगीर शहरांना अल्पसंख्याक बहुल शहर म्हणून घोषित केले आहे. दोन्ही शहरांतील अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी ५२ कोटी ८१ लाख रुपयांचे प्रस्ताव सरकारकडे पाठवले आहेत. जिल्हय़ात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र खरिपात २२१ टक्के वाढल्याची माहिती त्यांनी दिली.
यशवंत पंचायत राज्य अभियानात लातूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम, रेणापूर पंचायत समिती राज्यात तिसरी व मराठवाडय़ात प्रथम, अहमदपूर पंचायत समिती विभागात तिसरी व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. त्याबद्दल पाटील यांनी संबंधितांचे कौतुक केले. संगणकीय ग्रामीण महाराष्ट्रअंतर्गत २ लाख ८५ हजार प्रमाणपत्रे वितरित करून लातूरने राज्यात अग्रस्थान मिळविले. सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत ई-चावडी व ई-फेरफार कामात राज्यात प्रथम आल्याबद्दलही त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. कार्यक्रमास स्वातंत्र्यसनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अन्नसुरक्षा योजनेने गरीब
जनतेला दिलासा- थोरात
प्रतिनिधी, औरंगाबाद
अन्नसुरक्षा कायद्याची फेब्रुवारीपासून अंमलबजावणी होणार असून, गोरगरीब जनतेला दिलासा देणारी ही योजना ठरेल, असे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदान येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ थोरात यांच्या हस्ते झाला. खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, जि. प. अध्यक्ष शारदा जारवाल, आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, सुभाष झांबड, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, पोलीस आयुक्त संजय कुमार, महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, स्वातंत्र्यसैनिक आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्त संजय कुमार व उपअधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) रामनाथ चोपडे यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपतिपदक मिळाल्याबद्दल थोरात यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. जनगणना अधिकारी, कर्मचारी तसेच जोगेश्वरी ग्रामपंचायतीस ‘आयएसओ’ प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
औरंगाबाद खंडपीठात ध्वजवंदन
प्रजासत्ताकदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. न्या. आर. एम. बोरडे, न्या. एस. एस. शिंदे, न्या. ए. व्ही. निरगुडे, न्या. के. यू. चांदिवाल, रजिस्ट्रार व्ही. एस. कुलकर्णी तसेच वकील एस. बी. तळेकर, ए. एस. सावंत, व्ही. पी. गोलेवार आदी उपस्थित होते.
‘सुधारित सावकारी कायदा
शेतक ऱ्यांना मुक्त करणारा’
वार्ताहर, परभणी
शेतकऱ्यांना विविध संस्था, बँकांकडून पतपुरवठा केला जातो. मात्र, तरीदेखील शेतकरी व शेतमजुरांना काही अपरिहार्य कारणांमुळे सावकाराकडून कर्जाऊ रक्कम घ्यावी लागते. याचा फायदा उचलून शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे आर्थिक शोषण केले जाते. त्यास आळा घालण्यासाठी सुधारित व व्यापक तरतुदी असलेला नवीन कायदा तयार केला. या कायद्याने सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. या संदर्भात गावपातळीपासून जनजागृतीची मोठी आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश धस यांनी केले.
प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडासंकुल येथे झालेल्या मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमास जि. प. अध्यक्ष मीना बुधवंत, महापौर प्रताप देशमुख, आमदार बाबाजानी दुर्राणी व मीरा रेंगे, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे, होमगार्ड जिल्हा समादेशक डॉ. संजय टाकळकर आदी उपस्थित होते.
धस म्हणाले, की जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गेल्या २१ नोव्हेंबरला सुरू करण्यात आली. यात केशरी व पिवळय़ा शिधापत्रिकाधारकांना दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. यामध्ये ९७१ प्रकारचे उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ लाख ३२ हजार ९६३ पात्र लाभार्थी कुटुंबे आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २८७ रुग्णांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. यासाठी एक कोटी रुपयांचे मोफत उपचार झाले. धस यांनी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिकांची भेट घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा