दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होऊन परतलेल्या जिल्ह्य़ातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या १३ छात्रांचे आज पहाटे नगर महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. महाविद्यालयासाठी विशेष बाब म्हणजे या १३ छात्रांमधील पुष्पेंद्रसिंग हा ऑल इंडिया बेस्ट कॅडेट चे सुवर्णपदक मिळवलेला छात्र महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
छात्र सेनेची १७ महाराष्ट्र बटालियन व नगर महाविद्यालयाच्या वतीने या विक्रमी छात्रांच्या स्वागतासाठी पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुष्पेंद्रसिंग याच्याबरोबरच नंदू तरळ (पारनेर), सागर चोभे (न्यु आर्टस, नगर), तुषार वणे, स्वप्नील बोठे (नगर महाविद्यालय), अजित काटे, प्रशांत मांडे (छत्रपती शिवाजी विद्यालय, श्रीगोंदे), अविनाश बोस्टे, प्रशांत घालमे (कर्जत महाविद्यालय), सिद्धार्थ दरंदले, केतन माकोने (सोनई महाविद्यालय), भानुदास खेडकर (एस. टी. जे. विद्यालय, पाथर्डी), स्वप्नील कांबळे (नवोदय विद्यालय, पारनेर) यांनी दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभाग घेतला. महाराष्ट्राला सलग दुसऱ्या वर्षी मानाचा पंतप्रधान ध्वज मिळवून देण्यात या सर्व छात्रांचाही मोठा वाटा आहे.
पोलीस अधीक्षक शिंदे यांनी या सर्व छात्रांचे कौतूक केले. दिल्लीतील खडतर प्रशिक्षणात मिळालेल्या कौशल्य आता देशाच्या उपयोगात आणावे, अन्य छात्रांनाही तयार करावे असे आवाहन अधीक्षक शिंदे यांनी केले. १७ महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल के. एस. मारवा यांनी सांगितले की एका सहकारी अधिकाऱ्याने नगरमधील छात्राला बेस्ट कॅडेटचा बहुमान मिळणे शक्य नाही असा चॅलेंज केला होता. पुष्पेंद्रसिंग याने त्यांना खोटे ठरवले याचा आनंद आहे. १७ महाराष्ट्र बटालियन ही छात्र सेनेची देशातील एकमेव बटालियन आहे की जिचे एकूण १३ छात्र या संचलनात सहभागी झाले होते याचा अभिमान आहे असे मारवा म्हणाले. अधीक्षक शिंदे यांच्या हस्ते सर्व छात्रांचा गौरव करून त्यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.
छात्रांना कर्नल मारवा, मेजर शाम खरात, सुभेदार सत्येंद्रसिंग, नायब सुभेदार राजेंद्रसिंग यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाला लेफ्टनंट कर्नल आर. एस खत्री, सुभेदार जगमोहनसिंग, मेजर डॉ. सतीश सुर्यवंशी, कॅप्टन डॉ. अनिल आठरे, कॅप्टन सुरेश जाधव, लेफ्टनंट रविंद्र देशमुख, सेकंड ऑफिसर बी. बी. गांगुर्डे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन मेजर खरात यांनी केले.

Story img Loader