नक्षलवादी व दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता रविवारी गणराज्य दिनी नागपूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून साध्या वेशातील पोलीसही ठिकठिकाणी कानोसा घेत आहेत. नागरिकांनीही सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागपूर शहराला दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे गेल्या काही वर्षांतील घटनांनी स्पष्ट झाले आहे. त्यातच नक्षलवाद्यांचे नागपूर विश्रांती स्थळ असल्याचेही उघड झाले आहे. या पाश्र्वभूमीवर रविवारी २६ जानेवारीला नागपूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून साध्या वेशातील पोलीस शहराचा कानोसा घेत आहेत. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम कस्तुरचंद पार्कमध्ये होणार असून तेथे कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. कार्यक्रमस्थळी धातूशोधक यंत्राने तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार असून जागोजागी सशस्त्र पोलीस तैनात राहतील. गणराज्य दिन पाहता नागरिकांच्या संरक्षणासाठी सीपी टू पीसी सहा हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तात राहतील. पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाजकंटकांवर प्रतिबंधक कारवाई केली जात आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावर पोलिसांची पाळत असून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. शहरात मोर भवन, मध्यवर्ती बस स्थानक रेल्वे स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, विविध चित्रपटगृहे, मॉल्स, सीताबर्डी किल्ला, सीताबर्डी, महाल, इतवारी, धरमपेठ आदी बाजारपेठा, प्रमुख उद्याने, दीक्षाभूमी, साई मंदिर, गीता मंदिरांसह प्रमुख धार्मिक स्थळांवर पोलीस तैनात राहतील. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गस्ती पथके तयार करण्यात आली असून ते ठरवून दिलेल्या भागात गस्त घालतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महालमधील मुख्य कार्यालय तसेच रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात तैनात पोलिसांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
साध्या वेशातील पोलीसही शहराच्या विविध भागात कानोसा घेत आहेत. बॉम्ब शोधक व नाशकपथक तसेच श्वानपथक ठिकठिकाणी तपासणी करेल. नागरिकांनीही सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषत: ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतील अशा ठिकाणी खबरदारी घेण्याचे तसेच संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद हालचाली दिसल्यास लगेचच नियंत्रण कक्षाला कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. रेल्वे स्थानकावर तसेच रेल्वे गाडय़ांमध्ये रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान तैनात असून श्वानपथक रेल्वे स्थानक तसेच गाडय़ांमध्ये तपासणी करीत आहे. विमानतळावरही औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा