हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे श्रद्धा, ज्योतिष, योगायोग यावर प्रचंड विश्वास ठेवणारी जमात! अमुक बाबांनी सांगितले म्हणून चित्रपटाचे नाव पाच अक्षरांचे ठेवण्यापासून अमक्या तारखेला चित्रपट प्रदर्शित केला, तर हमखास चालतो अशा भविष्यवाणीपर्यंत सगळ्याच गोष्टींचे फॅड या मंडळींमध्ये असते. आमिर खानने आपले चित्रपट २५ डिसेंबरदरम्यान प्रदर्शित करण्याची किंवा सलमान खानने आपल्या चित्रपटासाठी ईदचा मुहूर्त पक्का केल्याची उदाहरणे भरपूर आहेत. मात्र आता ईद किंवा २५ डिसेंबर या तारखांबरोबरच २६ जानेवारीच्या आसपासची तारीख चांगला गल्ला जमवून देत असल्याचे लक्षात येत आहे.
गेल्या वर्षी २६ जानेवारीला हृतिक रोशनचा ‘अग्निपथ’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने २०१२ या कॅलेंडर वर्षांत शंभर कोटींचा ‘देवा श्रीगणेशा’ केला होता. प्रजासत्ताक दिनाची आणि त्यानंतर आलेल्या वीकेंडची सुट्टी याचा फायदा घेत या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ६७ कोटी जमवले. तर एकूण १२४ कोटींचा धंदा केला.
त्यानंतर यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘रेस-२’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला असला, तरी प्रेक्षकांनी मात्र गर्दी केली. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने ५० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवत चांगली सलामी दिली. एव्हाना त्याचा गल्ला १०१ कोटींवर गेला       आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी शंभर कोटींचा ‘बेंचमार्क’ ओलांडण्याची कामगिरी सलग दुसऱ्या वर्षीही केल्याने सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत ‘प्रजासत्ताक वीकेंड’ची चर्चा सुरू आहे. २६ जानेवारी पुढील वर्षी रविवारी व त्याच्या पुढील वर्षांत सोमवारी येत असल्याने या ‘प्रजासत्ताक वीकेंड’चा बोलबाला किमान दोन वर्षे तरी चालणार आहे.