नियमाप्रमाणे वेळोवेळी अहवाल सादर न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध अध्यासन केंद्र बंद करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास दिले आहेत. दरम्यान, ही अध्यासन केंद्रे पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी कुलगुरू यांनी पाठपुरावा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी दिला.
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीतून ताराबाई शिंदे, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद अध्यासन केंद्रांची स्थापना करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार या केंद्रांच्या वार्षिक कार्यक्रमांचा हिशेब वेळोवेळी सादर करणे गरजेचे असते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध अध्यासन केंद्राच्या संचालकांनी वेळोवेळी अहवाल सादर न केल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने ही अध्यासन केंद्रे बंद करण्याचा आदेश विद्यापीठाला दिला. त्यामुळे विद्यापीठाला नामुष्की पत्करावी लागत आहे. कुलगुरूंनी याची दखल घेऊन ही केंद्रे पूर्ववत सुरू ठेवण्यास पुढाकार घ्यावा, नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी पत्रकाद्वारे दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा