इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २४८३८ इतकी दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ती २५००० पेक्षा अधिक असल्याचा दावा करून गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घोटी ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी २००८ मध्ये विधानसभा अधिवेशनादरम्यान लेखी सूचनेव्दारे घोटी येथे नगरपालिका करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नगरविकास विभागाकडून विविध माहिती मागितली होती. नगर परिषद स्थापन करण्यासाठी ठरवून दिलेले सर्व निकष घोटी ग्रामपंचायत पूर्ण करत असल्याचा दावा अण्णासाहेब डोंगरे, मुन्ना अब्दुल शेख, कांतीभाऊ सूर्यवंशी, पांडुरंग मराठे या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसंख्येचा निकष तर गाव पूर्ण करतेच. शिवाय मौजे घोटी बुद्रुक येथील तलाठी यांच्या दाखल्यावरून अकृषिक रोजगाराची संख्या एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के इतकी आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर वसलेले हे गाव नाशिकपासून ४० ते ४५ किलोमीटरवर आहे. तर, इगतपुरी तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटरवर आहे. गावातून घोटी-सिन्नर नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार झाला असून मुंबईकडून शिर्डीकडे जाण्यासाठी घोटीमार्गे सोयीचा रस्ता विकसित करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्हा मंजूर प्रादेशिक विकास योजनेत घोटी-खंबाळे-डहाळेवाडीचा समावेश असलेला विकास केंद्र प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. घोटीच्या उत्तरेला एक किलोमीटरवर खंबाळे ग्रुप ग्रामपंचायत असून परिसरात बोर्ली, मुकणे, भावली, त्रिंगलवाडी, कांचनगाव येथे मोठी धरणे व बंधारे असून भामा व वाकीखार्पी ही मोठी धरणे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तेथील धरणग्रस्त मोठय़ा प्रमाणावर घोटीत स्थलांतरित झाले आहेत.
गाव परिसरात टाके, गोंदे, मुकणे, मुंढेगाव येथे औद्योगिकीकरण झाले असून घोटी ही तांदळाची बाजारपेठ असल्यामुळे ७० ते ८० भात व भगर गिरण्या, मुरमुरा कारखाना, गृह व लघु उद्योग कार्यान्वित आहेत. घोटी बुद्रुक ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ऑगस्ट २०१४ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे घोटी ग्रामपंचायतीचा नियोजित निवडणूक कार्यक्रम रद्द करून ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
घोटी ही जिल्ह्य़ातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी तांदुळ व इतर मालाचा मोठय़ा प्रमाणावर व्यापार होत असतो. त्यामुळे दररोज १० हजारपेक्षा अधिक लोकांची वर्दळ असते. सध्याच्या आर्थिक उत्पन्नात नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा देणे ग्रामपंचायतीला शक्य होत नसल्याचे दिसून येते. घोटीलगत कपिलधारा तीर्थ, पंपासरोवर, कावनई, टाकेद, घाटनदेवी
मंदिर, विपश्यना केंद्र तसेच कळसुबाई शिखर आहे. अशी पाश्र्वभूमी असल्याने घोटी बुद्रुक ग्रामपंचायतीला शासनाने नगर परिषद मंजूर करावी अशी मागणी
होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा