कमी क्षेत्रात व कमी पाण्यात अधिक उसाचे उत्पादन घेणे ही काळाची गरज बनली आहे. पाण्याचा स्रोत महत्त्वपूर्ण बनत चालला आहे. अशा स्थितीत उस शेतीमध्ये बदल केला नाही, तर साखर उद्योग अडचणीत येण्याची चिन्हे आहेत, असा इशारा छत्रपती शाहू महाराज यांनी शनिवारी येथे बोलताना दिला.
शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग व इंडियन शुगर्स यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या लोकविकास केंद्रामध्ये दोन दिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केल्यानंतर छत्रपती शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते यशस्वी साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात आले. दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ.सा.रे.पाटील यांना त्यांनी ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले.
अध्यक्षीय भाषणात प्रकुलगुरू डॉ.अशोक भोईटे म्हणाले, सहकारी साखर कारखाने स्थापन झाले तेव्हाची स्थिती व आजचे चित्र यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. साखर कारखानदारीला आता स्पर्धात्मक क्षेत्रातून वाटचाल करावी लागत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. १७७ सहकारी साखर कारखान्यांपैकी ५६ साखर कारखाने आजारी आहेत. हे चित्र सहकार साखर कारखानदारीत व शेतकरी यांच्या दृष्टीने चांगले नाही. सहकाराचा वेलू साखर क्षेत्रात फुलायचा असेल, तर काही कटू निर्णय घेऊन वाटचाल करणे अपरिहार्य ठरले आहे.     
डॉ.सा.रे.पाटील यांनी आपल्या ४३ वर्षांच्या सहकारी साखर कारखानदारीतील यशस्वी वाटचालीचा पट मांडला. ते म्हणाले, एकरी उत्पादन वाढविण्यासाठी दत्त कारखान्याने विशेष लक्ष पुरविले आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून एका शेतक ऱ्याने एकरी १२८ टन ऊस उत्पादन घेतले असून ते १३५ टनावर कसे नेता येईल यासाठी प्रयत्न चालविले आहेत. २० लोकांचे काम १६ जणांकडून कसे करता येईल, याचेही नियोजन केले आहे. काटकसरीचा कारभार केल्याशिवाय साखर कारखान्यांना सुगीचे दिवस येणार नाहीत.
अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.व्ही.बी.ककडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी सवरेत्कृष्ट साखर कारखाना म्हणून शाहू सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात आले. हा पुरस्कार कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी स्वीकारला. तसेच उत्कृष्ट कार्यकारी संचालक- विश्वनाथ शिंदे (कुंभी-कासारी कारखाना), उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी – श्रीनाथ रास्कर (मस्कोबा साखर कारखाना), आजारी कारखान्याचे पुर्नवसन – पी.एल.हरेर (आजरा साखर कारखाना) व उत्कृष्ट साखर कारखाना – डॉ.डी.बी.मुळे(उगार साखर कारखाना, कर्नाटक) यांनाही पुरस्कार देण्यात आले. या वेळी इंडियन शुगर्सचे विक्रमसिंग शिंदे, डॉ.राजगे, कुलसचिव मुळे, वित्त प्रमुख व्ही.डी.पाटील, डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.व्ही.बी.जुगळे उपस्थित होते. डॉ.डी.सी.तलुळे यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा