नागपुरातील ३७ यात्रेकरूंच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला
केदारनाथ येथील महाप्रलयानंतर महिनाभराने उत्तराखंड सरकारने आता मदतकार्य पूर्णपणे थांबविले असून नागपुरातील ३७ यात्रेकरूंच्या ठावठिकाण्याची अद्याप कोणतीही माहिती जिल्हा प्रशासन वा त्यांच्या कुटुंबीयांकडे उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.
यात्रकरूंच्या कुटुंबीयांनी वैयक्तिक पातळीवर शोधाचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरी कोणाचाही संपर्क झालेला नाही. नागपूरचे निवासी उप जिल्हाधिकारी प्रमोद भुसारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर यात्रेकरूंबाबत अद्यापही ठोस माहिती मिळाली नसल्याचे ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले. चंद्रपूरच्या जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर तसेच गोंदियाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी हेमलता बावनकर यांचाही अद्याप शोध लागलेला नाही.
स्मिता पौनीकर आणि हेमलता बावनकर १६ जूनपासून बेपत्ता आहेत. त्यांच्यासोबत गेलेले विनोद व आरती खुरसनकर, प्रदीप व स्वरूपा गुल्हाने आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगादेखील सापडलेला नाही.
प्रशासनाने यात्रेकरूंच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. उत्तराखंड सरकारने मदतकार्य थांबविल्याने कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. पौनीकर यांचे बंधू तुषार पौनीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अजूनही आम्ही आशा सोडली नाही. दुसरे बंधू डॉ. नितांत पौनीकर दिल्लीत बहिणीचा शोध घेत आहेत.
नागपुरातील  शालिनी खोंड, कुसुम पराते, श्रीकांत हातमोडे, महेश खेतान, सरोज, ऋ,षी, लोकेश, रश्मी, इशान साबू, अग्रवाल परिवारातील विमलादेवी, लक्ष्मीकांत, भावना, राशी, खुशी, सृष्टी, माही अग्रवाल तसेच विनोद आणि आरती खुरसनकर, बाबूराव, चंद्रभागा आणि बरखा चौधरी, अजय साहू, अर्चना, रिया, कन्हैय्या,  साहू, अशोक, प्रकृती/इंदू करण, धरणी योगेश जयस्वाल, प्रदीप स्वरुपा, प्रीतम गुल्हाने, हेमलता बावनकर सहारे, स्मिता पौनीकर यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. राज्य शासनातर्फे ऋषिकेश, हरिद्वार व डेहराडून येथे तीन मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. हरिद्वारच्या मदत केंद्राची जबाबदारी नागपूर विभागातील पाच अधिकाऱ्यांकडे होती.
ज्योतिष व्यवसायाला बरकत
बेपत्ता यात्रेकरूंच्या कुटुंबीयांच्या आशा अद्यापही कायम असून गेल्या काही दिवसांपासून ज्योतिष व्यवसायाला यामुळे एकाएकी बरकत आल्याची माहिती उत्तरखंड मदत मोहिमेत सहभागी झालेले सीएसी ऑल राऊंडरचे भवन पटेल यांनी दिली. भवन पटेल यांनी महिनाभर केदारनाथ आणि परिसरातील बचाव मोहिमेत सक्रिय भूमिका बजावली. नुकतेच ते नागपूरला परतले. हजारो लोक प्रलयात अडकलेले होते. त्यापैकी बहुतेकांची लष्कर आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांच्या मदतीने सुटका करण्यात यश आले आहे. परंतु, मलब्याखाली किती लोक गाडले गेले याची आकडेवारी मिळणे अशक्यप्राय आहे. सर्वत्र दलदल पसरली आहे, रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत. पूल वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीतही जवानांनी मदततकार्य राबविले. यात्रेकरूंचे नातेवाईक ज्योतिषांना विचारून त्यांचा ठावठिकाणा लागेल काय, अशा भाबडय़ा आशेने ज्योतिषी सांगेल त्या दिशेने शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात, असेही पटेल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा