‘ग्यानबा-तुकाराम’ च्या जयघोषात, टाळमृदंगाच्या गजरात वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालली असताना संत साहित्यातील योगदानाबद्दलचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार प्राचार्य रामदास डांगे यांच्या रूपाने निस्सीम साधकास जाहीर झाला. जन्म विदर्भातला, नोकरी मराठवाडय़ात आणि निवृत्तीनंतरचे संशोधन कार्य पुण्यात अशा प्रकारे अवघ्या महाराष्ट्राशी परिचीत असलेल्या प्राचार्य डांगे यांच्या अथक संशोधन प्रवासाला यानिमित्ताने राजमान्यता मिळाली आहे.
पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्राचार्य डांगे यांची प्रतिक्रिया होती, ‘या निमित्ताने सर्वाचे लक्ष प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी या प्रकल्पाकडे जावे. पुरस्कार मिळाल्यानंतर कौतुक ज्या व्यक्तीचे होते पण त्याच्या कामाकडेही सगळ्यांनी आस्थापूर्वक पाहिले पाहिजे. पुरस्काराची चर्चा केवळ व्यक्तिमाहात्म्य म्हणून होऊ नये.’
संत वाङ्मयाचा अभ्यास करताना प्राचार्य डांगे यांना एक बाब लक्षात आली, ती म्हणजे ज्ञानेश्वरी इतके पाठभेद कशातच नाहीत. शिवाय ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांची संख्याही खूप आहे. अशा वेळी सर्व प्रतींचा अभ्यास करून त्यांनी मूळपाठ दीपिका ज्ञानदेवी प्रत सिद्ध केली. जाणकारांच्या मते त्यांचे हे काम अतिशय मूलगामी व महत्त्वपूर्ण आहे. शात्रीय पद्धतीने प्रतिशुद्ध प्रत सिद्ध करताना प्राचार्य डांगे यांनी अथक परिश्रम घेतले. ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखितांचा शोध असताना त्यांनी अंदमान-निकोबार ते ग्रामीण महाराष्ट्रातल्या छोटय़ा खेडय़ापर्यंत शोध चालू ठेवला. ज्ञानेश्वरीच्या किमान २५ महत्त्वाच्या प्रती अक्षर ना अक्षर वाचल्या. त्यातूनच प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत सिद्ध झाली. १९९६ मध्ये सुरू झालेले हे शोधकार्य दशकभर चालले.
अलीकडे विद्यापीठीय पातळीवर संशोधन करताना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून गलेलठ्ठ अनुदान घेतले जाते. प्राचार्य डांगे यांनी मात्र आपले संशोधन कोणतेही अनुदान न घेता तडीस नेले. ते म्हणतात, ‘या कामासाठी आपल्याला कोणतेही अनुदान घ्यायचे नव्हते. पांडुरंगशात्री आठवले यांचे संस्कार आपणावर आहेत. त्यांनी सांगितले, हे काम भक्तीभावाने, श्रद्धेने कर. त्यांचा शब्द प्रमाण मानला. निवृत्तीनंतरचे सर्व लाभ संशोधन कार्यासाठी खर्च केले. ज्ञानेश्वरीची मूळपाठ दीपिका सिद्ध झाल्यानंतर त्याची म्हणावी तेवढी नोंद मात्र अजूनही घेतली गेली नाही.’ आपल्या संशोधनामागे प्रेरणा स्पष्ट करताना प्राचार्य डांगे यांनी व्यक्त केलेली ही खंत म्हणूनच खूप बोलकी आहे.
ज्ञानेश्वरी हा प्राचार्य डांगे यांच्या अतीव आदराचा, आस्थेचा विषय. आपल्या संशोधन प्रवासात वैशिष्टयपूर्ण अनुभव त्यांना आले. गंगाखेडला असताना १९७८ ते १९७९ दरम्यान सहज संध्याकाळी गोदाकाठावर भटकत असताना एका व्यक्तीकडून त्यांना ज्ञानेश्वरीची जीर्ण पोथी मिळाली. अहमदपूरच्या वीरशैव मठातील ही पोथी जीर्ण झाल्यामुळे गंगार्पण करण्यासाठी ही व्यक्ती आली होती. ही पोथी हस्तगत करून प्राचार्य डांगे यांनी ती नागपूरच्या प्रा. म. रा. जोशी यांच्याकडे दिली. याच पोथीत बाराव्या अध्यायात ‘स्यातुका’ ऐवजी ‘शेरातुका’असा पाठ आहे. असा पाठ असणाऱ्या पोथ्या दुर्मिळ आहेत, असे त्यावेळी जोशी यांचे मत होते. असे किती तरी प्रसंग या संशोधन यात्रेत प्राचार्य डांगे यांनी अनुभवले. मूळपाठ दीपिका ज्ञानदेवीला असलेली त्यांची प्रस्तावना ही चिकित्सक व संशोधनाच्या क्षेत्रातला आदर्श वस्तुपाठ आहे.
प्राचार्य डांगे यांच्या संशोधनाइतकेच महत्त्वाचे काम म्हणजे शब्दकोष व विपत्तीकोषाचे केलेले संपादन होय. शब्दकोषाचे सहा खंड प्रसिद्ध झाले. सातवा खंड पुरवणीचा आहे. शब्दकोष सिद्ध करताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या वेगवेगळ्या बोलीतील अनेक नवे शब्द त्यांनी अंतर्भूत केले आहेत. शब्दकोषाचे काम वीस वष्रे रेंगाळले होते. एवढय़ा प्रदीर्घ काळानंतर ते मार्गी लावण्याची जबाबदारी प्राचार्य डांगे यांच्यावर सोपविण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. ज्ञानेश्वरीची मूळ प्रत सिद्ध करताना त्यांच्यातल्या साधकाने नवनवीन क्षितिजे धुंडाळली. तसेच त्यांच्यातल्या संशोधकाने शब्दकोषाला सिद्ध करताना बोलीभाषेला महत्त्व दिले. आज वयाच्या ७८ व्या वर्षीही प्राचार्य डांगे यांची संशोधन यात्रा अथक सुरू आहे. ज्या निष्ठेने व श्रद्धेने भाविक वारी करतात त्याच निष्ठेने हा त्यांचा संशोधनाचा वारीतला प्रवास आहे.
‘शिवशाहीतील दोन संत’, ‘देशीकारलेणे’ ही त्यांची महत्त्वाची ग्रंथसंपदा. राज्य सरकारच्या ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्काराने प्राचार्य डांगे यांच्या संशोधन कार्यावर कळसाध्याय चढवला. रा. चिं. ढेरे, दादामहाराज मनमाडकर, डॉ. यु. म. पठाण आदी मान्यवर संतसाहित्य अभ्यासकांना या पुरस्काराने यापूर्वी गौरविले आहे.
संशोधक वारकरी!
‘ग्यानबा-तुकाराम’ च्या जयघोषात, टाळमृदंगाच्या गजरात वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालली असताना संत साहित्यातील योगदानाबद्दलचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार प्राचार्य रामदास डांगे यांच्या रूपाने निस्सीम साधकास जाहीर झाला.
First published on: 13-07-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Researcher warkaree