मराठा समाजाला आरक्षण आचार संहितेपूर्वी जाहीर करावे अन्यथा सत्ताधाऱ्यांना समाज त्यांची जागा दाखवेल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी रविवारी येथे बोलताना दिला. तसेच  राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
    शाहू स्मारक भवन येथे आयोजित मराठा आरक्षण मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, इतर समाजाचे आरक्षण कमी करुन मराठा समाजास आरक्षण मिळावे अशी समाजाची भूमिका नाही. पण तरीही अजूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी सकारात्मक दिसत आहेत. मात्र इतर पक्ष यामध्ये आडकाठी करत आहेत. मराठा आरक्षण मिळावे यासाठी राणे समिती नेमण्यात आली आहे. अभ्यास करून समिती अहवाल तयार करत आहे. या अहवालाद्वारे शासनाकडे आरक्षणाची मागणी केली जाणार आहे. त्यानुसार आरक्षण द्यावे लागेल अन्यथा आरक्षण न देण्याची कारणे समितीला द्यावी लागतील. आरक्षण मिळावे यासाठी आपण संघर्ष करण्यास तयार आहोत, वेळ पडल्यास दोन हात करण्यास आपण तयार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सध्या सुरु असलेल्या ऊसदाराच्या  पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम मिळालाच पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, मराठा आरक्षणाला ३३ समाजाने पाठिंबा दिला आहे. आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे.  इतर राज्यातील आरक्षनाप्रमाणे आरक्षण लागू करावे, लोकसंख्येच्या २५ टक्के आरक्षण जाहीर करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या मागणीसाठी जर रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यास संपूर्ण जनजीवन विस्कळीत होईल. येत्या काळात आरक्षणासाठी लाखोंचा मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोकुळचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी राज्यात ५० टक्के मराठा समाज आहे.मात्र आरक्षणाअभावी समाज दारिद्रय़रेषेखाली जात आहे. ९२ टक्के मार्क मिळूनही समाजातील मुलांना नोकऱ्या मिळत नाही. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी अद्याप लोक एकत्र येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नी आवाहन केल्यावर सर्वानी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दि.जी.पाटील यांनी केले. उद्योजक मोहन जाधव, भगवानराव काटे, अशोकराव कराळे, किशोर घाटगे, शंकरराव शेळके, शिवाजीराव पाटील, शिवाजीराव गराडे, शैलजा भोसले, संतोष सावंत, दीपक पाटील, विजय काकोडकर यांच्यासह कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.