स्थायी समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना विलक्षण वेग आला असून ज्यांच्या बळावर मनसेने यंदा पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती घेण्याची व्यूहरचना आखली आहे, त्या शिवसेनेकडून हिरवा कंदील मिळाल्याने हा मार्ग प्रशस्त झाल्याचे दिसत असले तरी सेनेतील अंतर्गत धुसफूस शमविण्यात यश येते की अपयश, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यातच विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अपक्ष गटाने या उलथा-पालथीकडे नजर ठेवून निवडणूक लढविण्याचे धोरण ठेवले आहे.
महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी नऊ जणांनी अर्ज भरले आहेत. प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत ‘महायुती’मुळे घडलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती पुन्हा एकदा महापालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी मनसेने मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने मनसेच्या पाठीशी उभे राहावे, असे निर्देश खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे हा तिढा सुटला असे वरकरणी वाटत असले तरी अ‍ॅड. शिवाजी सहाणे व सूर्यकांत लवटे यांनी दाखल केलेले अर्ज माघारी घेतले जावेत, याकरिता पदाधिकाऱ्यांना चांगलीच दमछाक करावी लागणार असल्याचे दिसत आहे. त्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपविली असली तरी हे दोघे इच्छुक अखेरच्या क्षणी काय भूमिका घेतात, याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात आहेत.
सद्यस्थितीत स्थायीत मनसेचे पाच, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, भाजप व काँग्रेस प्रत्येकी दोन तर अपक्ष गटाचे एक असे बलाबल आहे. शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास मनसे व भाजपचे मिळून दहा सदस्य होतात तर विरोधकांकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष गट असे मिळून सहा इतके संख्याबळ होते. असे असले तरी स्थायी सभापतीपदासाठी भाजपचे बाळासाहेब सानप व सीमा हिरे यांनी अर्ज भरले आहेत. गेल्या वेळी मनसेने भाजपला हे पद देण्याचे कबूल केल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. परंतु, भाजपचा उमेदवार रिंगणात आल्यास सेनेचा पाठिंबा राहण्याची शक्यता नाही. कारण, महापालिका निवडणुकीत भाजपने सेनेला कात्रजचा घाट दाखवून स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. मनसेतही या पदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. अशोक मुर्तडक व रमेश धोंगडे यांच्यापैकी कोणाला उमेदवार मिळणार याबद्दल पदाधिकारी मुंबईकडे डोळे लावून बसले. या संदर्भात शुक्रवारी पाच वाजता आ. वसंत गिते यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप अंतिम नाव निश्चित झाले नसल्याचे सांगण्यात आले. मनसे-भाजप-शिवसेना या महायुतीच्या गोटात या पद्धतीने चाललेल्या घडामोडी लक्षात घेऊन विरोधकांनी निवडणूक लढविण्याची रणनीती आखली आहे. त्यांच्याकडून अपक्षांना संधी असून त्या अनुषंगाने शबाना ताहेरखान पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे. ऐनवेळी काय घडामोडी घडतात, हे पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी ठेवली आहे.