महापालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी
महापालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांना प्रथिनेयुक्त आहार देण्यात येणार आहे. शीव रुग्णालयातील डॉ. खंदारे यांचा क्षयरोगाने मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर सुनील प्रभू यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
२००५ पासून मुंबईत ‘सेन्सेटिव्ह टीबी’चे ३० हजार रुग्ण तर २०१२ नंतर ‘एमडीआर टीबी’चे २,५०० रुग्ण आढळून आले आहेत. धारावी परिसरातही क्षयरुग्णांची संख्या वाढली आहे. धारावी आणि गोवंडी येथे या रोगाची तपासणी करणारी अत्याधुनिक यंत्रे बसविण्यात आली असून कांदिवली, शीवडी येथील क्षयरोग रुग्णालय, कुर्ला व राजावाडी येथेही ही यंत्रे बसविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.